उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिरनेर येथे आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेत 55 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरुवातीला 4 ते 10 जून असा लॉकडाऊन करण्यात आला होता. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सुचनेमुळे त्यात पुढील तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. एकूण या 10 दिवसांच्या लॉकडाऊन काळात दर दिवशी आरोग्य विभागामार्फत किमान 30 ते 35 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. त्यामध्ये दररोज पाच ते सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते, मात्र त्यामध्ये बर्याच अंशी फरक होऊन ती संख्या एक-दोनवर आली आहे. चिरनेरमध्ये कोरोनाच्या वाढती रुग्णांच्या आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने एकूण 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता, तसेच नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी दंडात्मक कारवाईचीही घोषणा केली होती. याचा फायदा होऊन दररोज आढळून येणार्या कोरोनाची संख्या आता कमी होऊन एक-दोनवर येऊन ठेपली आहे. यानंतर चिरनेर गाव कोविड मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातुन काल चिरनेर येथील प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य अधिकारी डॉ. संदिप चोरमाले डॉ. हाटोरे यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील 55 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.