Breaking News

कोकण विभागात दोन हजार 765 आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे शनिवारी (दि. 16) कोकण विभागात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ विभागातील सामान्य रुग्णालयांमध्ये करण्यात आला. कोकण विभागात विविध ठिकाणी कार्यरत असलेले आरोग्य अधिकारी तसेच मान्यवरांनी पहिली लस टोचून घेऊन या मोहिमेची सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांवर दोन हजार 765 आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जनतेला मोठा दिलासा मिळाला. बहुप्रतीक्षित कोरोनावरील प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत याची सुरुवात झाली. सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोविशील्ड’ ही लस पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना देण्यात आली.

कोकण विभागात विविध ठिकाणी हे लसीकरण एकाच वेळी सुरू करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात एक हजार 740, रायगड 268, पालघर 257 आणि रत्नागिरी 500 असे कोकण विभागात एकूण दोन हजार 765 आरोग्य कर्मचार्‍यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले.

या लसीकरण मोहिमेसाठी ठाणे 74 हजार, पालघर 19 हजार 500, रायगड नऊ हजार 500 आणि रत्नागिरी 16 हजार 330 अशा कोकण विभागासाठी एकूण एक लाख 19 हजार 330 कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्या आहेत.

पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असून त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. या लसीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply