माथेरान भाजपची मागणी
कर्जत : बातमीदार
माथेरान येथून कर्जत आणि नेरळ येथे जाण्यासाठी असलेली राज्य परिवहन महामंडळाची मिनीबस सेवा कर्जत आगाराने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी माथेरान भाजपने केली आहे. त्याबाबत माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी भाजपच्या वतीने कर्जत एसटी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.
कर्जत एसटी आगराकडून कर्जत नेरळ-माथेरान अशी मिनीबस सेवा सुरू होती, मात्र लॉकडाऊनमुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे.
मिनीबस बंद असल्याने माथेरान शहरातील विद्यार्थी आणि नोकरी करणारे तरुण यांना आर्थिक भुर्दंड सहन करीत अन्य वाहनांतून नेरळ येथे जावे लागत आहे. आता एसटी गाड्या हळूहळू सुरू झाल्या असून माथेरान मिनीबसदेखील सुरू करावी, असे निवेदन उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी कर्जत एसटी आगार प्रमुखांना दिले आहे.
माथेरान भाजपचे अध्यक्ष विलास पाटील, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, नगरसेविका प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, सोनम दाभेकर, ज्योती सोनवले, प्रियांका कदम, रुपाली आखाडे, राकेश चौधरी, संदीप कदम, भाजप कार्यकर्ते प्रदीप घावरे, कुलदीप जाधव, शैलेंद्र दळवी, शेलार, प्रवीण सकपाळ, किरण चौधरी यांच्यासह विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.