Breaking News

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा!

खासदार उदयनराजेंचे राज्य सरकारला आव्हान

पुणे ः प्रतिनिधी
मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. दम असेल तर राज्याने अधिवेशन बोलवावे. नंतर मी केंद्राचे पाहतो, असे आव्हान खासदार छत्रपती उदयनराजे यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणावरून आंदोलनाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 14) उदयनराजेंची भेट घेतली. पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पत्रकार परिषदेनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. संभाजीराजे यांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे, असे या वेळी उदयनराजे यांनी सांगितले.
आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करीत आहे तर ते राज्यकर्ते. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचे आहे. व्यक्तीकेंद्रित राजकारण सुरू असून उद्रेक झाल्यास राज्यकर्ते जबाबदार असतील. त्या वेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे, अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.
मुद्द्यांवर आधारित राजकारण केले तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केले जात आहे. कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे. न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही, असे सांगून संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असून शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.
अनेक मुद्द्यांवर आमचे एकमत -संभाजीराजे
दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. कोल्हापूर आणि सातार्‍याचे घराणे एकत्र आले याचा मला आनंद आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. म्हणून मी उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून अनेक मुद्द्यांवर एकमत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात, असे या वेळी संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

36 जिल्ह्यांत मेळावे, मुंबईत 10 हजार बाइकची रॅली : विनायक मेटे
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाचे आयोजन केल्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा सोमवारी (दि. 14) स्पष्ट केली. या वेळी त्यांनी 36 जिल्ह्यांत मेळावे घेणार असल्याचे म्हटलेय. त्याचबरोबर 26 जून रोजी औरंगाबादेत मेळावा, 27 जून रोजी मुंबईत 10 हजार बाइकची रॅली काढण्याची घोषणा केलीय. इतकेच नाही तर 7 जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला पाठिंब्याचे दिलेले पत्र हे राज्य सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. नक्षलवाद्यांच्या सहानुभूतीच्या जाळ्यात मराठा समाजातील पिचलेले तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान होईल. अशा वेळी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाबाबत सरकारकडून एकही प्रतिक्रिया येत नाही हे दुर्दैव असल्याची टीका मेटे यांनी केली.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा पुन्हा अभ्यास केला जावा -शाहू महाराज
कोल्हापूर ः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 14) कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीनंतर शाहू महाराजांनी माध्यमांशी बातचित करीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल पुन्हा एकदा अभ्यासला पाहिजे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजेदेखील उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये शनिवारी युवा निर्धार मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल विधानसभेच्या वतीने शनिवारी (दि. 26) सायंकाळी …

Leave a Reply