Breaking News

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा; शेकापचे इतर नेतेही भागीदार

  • आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोप
  • आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने काढले पैसे
  • राज्यातील मविआ सरकारचा कारभारही संशयास्पद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ 65 खात्यांपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे इतर नेतेसुद्धा भागीदार आहेत. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ड्राफद्वारे पैसे काढण्यात आल्याच्या एण्ट्रीज आमच्या हाती लागल्या आहेत, असा सनसनाटी आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 16) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीकडून बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना पाठीशी घातले गेल्याचे सांगत त्यांनी या वेळी राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले.
कर्नाळा बँकेत पैशांची अफरातफर (मनी लॉण्डरिंग) झाल्याच्या प्रकारावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी रात्री कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न व पाठपुरावा यांचा आढावा घेतला. यासोबतच महाविकास आघाडी सरकारने या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करून विवेक पाटील यांना संरक्षण देत ठेवीदारांवर कसा अन्याय केला याचा पाढाच वाचला.
कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह मला विधानसभेच्या पायर्‍यावर बसावे लागले. त्या वेळी सहकारमंत्र्यांनी भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले गेले नाही. राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याचे आमच्या लक्षात आले होते. सुदैवाने पैशांची अफरातफर झाल्याचे ईडीच्या लक्षात आले. त्यानुसार माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाली. त्यामुळे ठेवीदारांना विश्वास निर्माण झाला आहे. विवेक पाटलांना अटक झाली ती 63 ते 65 खात्यांपुरती मर्यादित आहे. त्या पलीकडे जाऊन यामध्ये आणखी गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने 2002 आणि 2005 या कालावधीमध्ये ओव्हर ड्राफ्टने पैसे काढण्यात आले आहेत. त्यांचे नाव 63 जणांच्या यादीमध्ये कुठेच नाही. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून शेकापच्या नेत्यांना ओरडून सांगतोय की, तुम्ही या घोटाळ्याप्रकरणी आवाज उठवा. 
तुमचे कार्यकर्ते, मतदार यांच्या पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे, पण त्यांच्या नेत्यांनी याबाबत एक चकार शब्दसुद्धा काढला नाही. उलट शेकाप आणि महाविकास आघाडीच्या बॅनरवर आजही विवेक पाटील यांचा फोटो आहे. ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदारांचे 500 कोटींपेक्षा रुपये हडप केले आहेत अशा घोटाळेबाज विवेक पाटील यांना शेकाप आणि महाविकास आघाडी पाठीशी घालत आहे. या गैरव्यवहारात शेकापच्या इतर नेत्यांनासुद्धा लाभ झाला आहे. विवेक पाटील यांना पाठीशी घालणारे, या गैरव्यवहारांमध्ये भागीदार असणार्‍या सर्वांची सखोल चौकशी व्हायला हवी. कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यात राज्य सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केले, परंतु ईडीने केलेल्या कारवाईमुळे ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा कायम असेल.
पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार, ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक ग्राहक भयभीत झाले होते. सप्टेंबर 2019मध्ये ठेवीदारांनी, ग्राहकांनी आमच्याकडे येऊन आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी केली. जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचा निश्चय केला. त्या अनुषंगाने आम्ही लक्ष घातले आणि याकामी आम्हाला माजी खासदार किरीट सोमय्या यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला बँकेत कुठलाच घोटाळा नाही, असे बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेकडून छातीठोकपणे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर पैसे परत देतो, असे आश्वासन अनेकदा ठेवीदारांना देण्यात आले, मात्र काही काळ लोटूनही ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळाले नाहीत आणि विवेक पाटीलांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. या दरम्यान विधानसभा निवडणूक होती आणि ही निवडणूक झाल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ सुरूच राहिली. त्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही रेटा लावला. बँकेची चौकशी करण्याची मागणी पूर्वीच केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही नियमानुसार कार्यवाही करायला सुरुवात केली. राज्याचा गृह विभाग, विधिमंडळ, सहकार आरबीआय, ईडी, सीआयडी यांच्याकडे पाठपुरावा करण्याबरोबरच आंदोलन, मोर्चे करून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. सहकार आयुक्तांनी या अहवालाची तपासणी करून कर्नाळा बँकेत घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही कार्यवाहीला गती मिळाली नाही. राज्य शासनाच्या अखत्यारीत येणार्‍या यंत्रणांनीही कायम दुर्लक्ष केले. आरबीआयकडे हा विषय गेला असताना त्यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाल्याने मुंबईत आरबीआयच्या कार्यालयावर ठेवीदारांसह जोरदार मोर्चा काढला. त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये कर्नाळा बँकेवरही मोर्चा नेऊन ठेवीदारांचे पैसे द्या, असा टाहो फोडला. विधिमंडळात आवाज उठविला, सहकार खाते, गृहखात्याकडे या संदर्भात दाद मागितली. अर्थातच, महाविकास आघाडीतील घटक असल्यामुळे विवेक पाटील यांच्यावर कारवाई होण्यास टाळाटाळच होत राहिली. गृहमंत्री हे विरोधी पक्षावरील कारवाईला तातडीने मंजुरी देतात, मात्र या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाणूनबुजून टाळाटाळ केली. त्यानंतर आम्ही सीआयडीकडे दाद मागितली, मात्र तेथेही एवढ्या मोठ्या घोटाळ्याच्या चौकशीला उशीर लावला गेला. राज्य शासन या बाबतीत ठेवीदारांना न्याय देणार नाही याची आम्हाला खात्रीच पटली. त्यामुळे याचा तपास ईडीने करावी, अशी आम्ही जोरदार मागणी व पाठपुरावा केला. त्यानंतर काल झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोटाळ्यातून विवेक पाटील यांनी पैसे कसे लंपास केले याचा शोध समोर येईलच, पण ठेवीदारांचे पैसे त्यांनी परत करावेत, ही आमची आग्रही मागणी असून त्यासाठी आमचा कायम पाठपुरावा आणि संघर्ष राहील.
दैनिक निर्भीड लेखने 18 ऑगस्ट 2019 रोजी विवेक पाटील यांची बाजू मांडत कर्नाळा बँकेत घोटाळा नाही, अशी जाहीर प्रसिद्धी केली होती. त्या संदर्भात पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, आमची समिती पहिल्या तक्रारीपासून या विषयात ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून काम करीत आहे, मात्र कांतीलाल कडू हे त्यांच्या समितीच्या माध्यमातून बोभाटा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे त्यात विवेक पाटीलांचाच एक कार्यकर्ता हाताशी घेऊन विवेक पाटलांना वाचवण्याचा आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आता कारवाई होणार आहे असे चित्र समोर येत असताना ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय, असा आभास कडू यांनी निर्माण केला, असे सांगतानाच आम्ही श्रेय घेण्यासाठी नाही, तर ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे ठेवीदारांची दिशाभूल करण्याचा वाईट प्रयत्न करू नका, असा सल्लाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिला.  
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे 2 मार्च 1996पासून कर्नाळा बँकेचे संचालक होते, मात्र आपल्या कामातून त्यांना वेळ मिळत नसल्याने त्यांनी स्वत:च संचालक म्हणून काम करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे नाव संचालक मंडळातून 11 जून 1997 रोजी कमी करण्यात आले. त्यांनी कर्नाळा बँकेवर संचालक म्हणून केवळ नऊ महिने सहा दिवसच काम केले होते. त्यानंतर त्यांनी कधीही कर्नाळा बँकेचे संचालक अथवा पदाधिकारी म्हणून बँकेच्या कारभारात सहभाग घेतला नाही. असे असतानाही कांतीलाल कडू यांनी कुठलीही माहिती न घेता फक्त खोटा ढिंडोरा पिटला.  चौकशीच्या अनुषंगाने कर्नाळा बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने कर्नाळा बँकेचे चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दोषमुक्त करुन त्यांचे नाव या चौकशीतून वगळण्याचा निर्णय एका आदेशानुसार जाहीर केलेला आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुंतवण्याचा खोटेपणा करणार्‍यांचे पितळ उघडे पडले, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी नमूद केले.
कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी गृह खात्याने लक्ष घालणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. उलट भ्रष्टाचाराला वाचविण्यासाठी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचे प्रयत्न झाल्याचे दिसून येते. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात कार्यवाही व्हावी, यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
 या वेळी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांनी परिषदेत माहिती देताना म्हटले की, 17 शाखांचा कारभार राहिलेल्या या बँकेत जवळपास 40 हजार खातेदारांचे पैसे अडकले. तरीसुद्धा विवेक पाटील उजळ माथ्याने फिरत राहिले. कारण त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. त्यामुळे एवढा मोठा घोटाळा असतानाही शेकाप आणि महाविकास आघाडीच्या पुढार्‍यांनी या घोटाळ्याविरोधात आवाज उठविला नाही. 529 कोटी 36 लाख 55 हजार 26 रुपयांच्या कर्नाळा बँक आर्थिक घोटाळ्यामुळे अनेक जणांना स्वतःच्या पैशाअभावी प्राण गमवावे लागले. अनेकांचे आजाराने निधन झाले, अनेकांना वैद्यकीय उपचार घेता आले नाहीत. त्याचबरोबर अनेकांचे विवाह, मंगलकार्येसुद्धा झाली नाहीत. या आणि अशा अनेक कारणाने हा बँक घोटाळा राज्यभरात गाजला, मात्र तरीसुद्धा महाविकास आघाडी सरकारने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. आम्ही ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका कायम ठेवली तसेच कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल ही ठाम भूमिका घेत सततचा पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने काल ईडीने विवेक पाटीलांवर कारवाई केली आहे. हा लढा इथे थांबणार नाही तर ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देईपर्यंत चालूच राहाणार आहे. निवडणुकीच्या काळात जाहीर भाषणात विवेक पाटील यांनी ‘मला कुणीही अटक करणार नाही’, अशी गर्जना केली होती. आम्हीही चॅलेंज दिले होते ’विवेक पाटलांची अटक अटळ आहे आणि ती होणारच’. अखेर ती झालीच.
या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील हेही उपस्थित होते.
विवेक पाटलांना अटक होणार हा माझा शब्द खरा ठरला -आमदार महेश बालदी
उरण विधानसभा मतदारसंघात मी आणि विवेक पाटील निवडणूक लढलो. ते तीन नंबरवर फेकले गेले. विवेक पाटील यांना अटक होणार, असा शब्द मी निवडणुकीच्या कालावधीत ठेवीदारांना दिला होता. कालच्या ईडीकडून झालेल्या अटकेने तो खरा ठरला, असे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांनी या वेळी सांगितले. मोहोपाडा येथे झालेल्या सभेत ‘कोणाचाही बाप आला तरी मला अटक होऊ शकत नाही’ असे छातीठोकपणे विवेक पाटील सांगत होते. माझे व त्यांचे वडील वर गेले आहेत. त्यांचा विषय नाही, मात्र तुम्ही व तुमचा मुलगा नक्कीच आत  जाल, असे जाहीरपणे मी सांगितले होते. ते खरे ठरले, असेही आमदार महेश बालदी म्हणाले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply