अलिबाग येथील प्रकार
अलिबाग : प्रतिनिधी
येथील जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या नव्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. या सेंटरमधील अस्वच्छतेबाबतही अनेक तक्रारी आहेत.
रायगडात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन झाले. या सेंटरला गळती लागली आहे. खिडक्या व भिंतीतून पाणी आत येत असून ते वॉर्डमध्ये पसरत आहे. भिंतीही ओल्या झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये नाराजी पसरली आहे.
गेली अनेक वर्षे या इमारतीचे बांधकाम सुरू होते. ते नुकतेच पूर्ण होऊन पहिल्यांदाच कोविड रुग्णांसाठी ही इमारत वापरात आली आहे. महिला व पुरुष रुग्णांसाठी येथे एकच कॉमन टॉयलेट ठेवण्यात आले असून त्यामुळे महिला रुग्णांची कुचंबणा होत आहे. या सेंटरमधील स्वच्छतागृह तुंबू लागले आहे. येथील अस्वच्छतेमुळे रुग्ण येथे दाखल होण्यास नकार देत आहेत, तर अनेक रुग्णांनी दुसर्या रुग्णालयात जाणे पसंत केले.
या कोविड सेंटरमध्ये 90 रुग्ण उपचार घेत आहेत. येथील कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलविले असल्याने त्यांचे हाल झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा फटका या रुग्णांना सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अलिबाग येथील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे (डीकेईटी) अध्यक्ष अमर वार्डे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून या कोविड सेेंटरमधील समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. कोविड सेंटरमधील स्वच्छतेसाठी खासगी संस्थांची मदत हवी असल्यास ती मिळवून देण्यास आमची तयारी आहे. आम्ही आमच्या ट्रस्टकडून मदत देऊ, असे वार्डे यांनी म्हटले आहे.
अलिबाग येथील कोविड सेंटरच्या नवीन इमारतीची पाणी येऊन दुर्दशा झाली आहे. या इमारतीमध्ये पुरुष आणि महिला रुग्णांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. त्यामुळे महिला रुग्णांना खूप अवघडल्यासारखे वाटत आहे. मी स्वतः अनुभव घेत आहे
– अशोक वारगे, तालुका अध्यक्ष, भाजप ओबीसी सेल, अलिबाग