मुंबई ः प्रतिनिधी
काँग्रेसला जे 12 वर्षांत कळले नाही ते भाजपला दीड वर्षात कळले, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर दिली आहे. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष म्हणून जी भाजपची ओळख आहे त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचेही नितेश राणे म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून राणेसाहेब निश्चितपणे प्रमाणिक प्रयत्न करतील, मेहनत करतील. आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अभ्यास आणि वरिष्ठतेचाही त्यांना फायदा मिळेल. त्यामध्येही राणेसाहेब पहिल्या दोन-तीन क्रमांकावर आहेत. म्हणून याचा फायदा भारतीय जनता पक्ष संघटन म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने होईल. कोकण असेल, महाराष्ट्र असो, जिथे जिथे आज भाजप वाढवण्याची गरज आहे तिथे आजचा दिवस आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. सहा वर्षांनंतर नारायण राणे यांचे मंत्री म्हणून कमबॅक होतेय यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, मी याचे श्रेय भाजपच्या नेतृत्वाला देईन. जे काँग्रेसला 12 वर्षे समजले नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळले की राणेंची किंमत काय आहे, त्यांचे वजन काय आहे. त्यांचा अभ्यास आणि अनुभव काय आहे. काँग्रेसने वारंवार राणेंना शब्द देऊनही तो पूर्ण केला नाही, पण अवघ्या दीड वर्षात भाजपने मला आमदार केले. माझ्या मोठ्या बंधूंना प्रदेश भाजपत काम करण्याची संधी दिली. राणेसाहेबांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली. या संधीचा ते नक्कीच सामान्य जनतेसाठी चांगल्या प्रकारे उपयोग करतील.
‘राणे कुटुंबाला संपवण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील’
निलेश राणे म्हणाले की, आम्हाला संपवणे अशक्य आहे. नारायण राणे यांना या जन्मातच काय पण अनेक जन्मातही संपवता येणार नाही. त्यासाठी विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील. नारायण राणे मुख्यमंत्री होताना अचानक झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत कसलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. नारायण राणेंचा तेव्हाचा मुख्यमंत्रिपदाचा काळ आठवा. ते जबाबदारी गांभीर्याने घेतात. त्यांनी आजवर प्रत्येक पदाला गांभीर्याने घेतले आहे. म्हणून आताची केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारीही ते चोख बजावतील. याद्वारे देशाची सेवा करायची संधी त्यांना मिळाली आहे.