Breaking News

कामोठेवासीयांच्या मूलभूत समस्यांबाबत सिडको अधिकार्यांना घेतले फैलावर

नगरसेवक विकास घरत यांचा रुद्रावतार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठे वसाहतीतील सेक्टर 34मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमूत्राने ओसंडून वाहत आहेत. त्याची तक्रार करूनसुद्धा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले. त्यांनी रहिवाशांसह थेट सिडको कार्यालयात धडक देत अधिकार्‍यांना फैलावर घेताच कामे मार्गी लागली आहेत.

याबाबत नगरसेवक विकास घरत म्हणाले की, सेक्टर 34 परिसरात सांडपाण्याच्या टाक्या वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यावर घोंगावणार्‍या माशा व 24 तास वाहणार्‍या सांडपाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हेच पाणी पिण्याच्या पाण्यातदेखील मिसळते. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय येथील चेंबरवरील झाकणे नाहीशी झाली आहेत. पदपथ अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा सगळ्या समस्यांसाठी नागरिकांनी तक्रारी करून, आम्ही पाठपुरावा

करूनदेखील कामे होत नसतील, तर मला रुद्रावतार धारण करावा लागेल. आज येथील समस्याग्रस्त नागरिकांना घेऊन मी कामोठे सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये कार्यकारी अभियंता विलास बनकर यांची भेट घेतली. आता आठ दिवसांत नवीन पाइप टाकण्याचे काम सुरू होईल. तोपर्यंत जेट आणि सक्शन मशीनद्वारे टाक्या साफ केल्या जातील.

घरत पुढे म्हणाले की, खरंतर या समस्या आणि याव्यतिरिक्त अन्य भेडसावणारे प्रश्न यासाठी आम्ही सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसांपूर्वी अधिकार्‍यांची एक बैठक घेतली, परंतु अधिकार्‍यांच्याशी झालेल्या बैठकीतून जर प्रश्न सुटणार नसतील, तर आम्हाला आक्रमक व्हावे लागेल. ठेकेदार जर कामे करीत नसतील, तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी सिडको अधिकार्‍यांची आहे, परंतु बहुतांश वेळेला समस्या निर्माण झाल्यास ठेकेदार यांच्यासोबत नागरिक आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांचे वाद होतात.

या वेळी कार्यकारी अभियंता बनकर यांनी पाइपलाइन बदलण्याच्या कामाबाबत प्रशासकीय मंजुरी आली असून आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल, असे आश्वासन दिले तसेच मेनहोलवर फ्रेम व झाकण बसवण्याचे काम तातडीने सुरू होईल, असेदेखील त्यांनी सांगितले. या वेळी नगरसेवक विकास घरत यांच्या समवेत नगरसेवक डॉ. अरुण भगत आणि सेक्टर 34मधील रहिवासी उपस्थित होते.

सगळ्या समस्या जर कूर्मगतीने सुटत असतील, तर याला सिडको आणि पनवेल महानगरपालिका प्रशासन दोघेही तितकेच जबाबदार आहेत. 2017मध्ये पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाला येथील समस्यांची पुरेपूर जाण आहे, परंतु हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आणि लालफितीमध्ये जर समस्या जशाच्या तशा राहणार असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ते कधीही सहन करणार नाही.  सिडकोने प्रथम सर्व सेवासुविधा दोषमुक्त कराव्यात आणि मगच पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित कराव्यात.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply