Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांना विरोधकांकडे कोणतेही उत्तर नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन झाली आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी कामे केली आहेत त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी अवस्थ झाली असून राज्य, केंद्र सरकारविरोधात सातत्याने टीका सुरू आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची जी एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी रेषा आखण्याचे काम विरोधकांनी करावे, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍याबद्दल माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. गणेशोत्सव काळात दरवर्षी ते मुंबईत येतात. मुंबई त्यांची जन्मभूमी असून मुंबईशी त्यांचे वेगळे नाते आहे. ते लालबागचा राजा, आशिष शेलारांचा गणपती दर्शन, मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही गणेश दर्शनासाठी येतील. याशिवाय एका शाळेचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे भाजप पदाधिकार्‍यांसोबत त्यांची एक बैठक होईल.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply