मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे, परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी या चर्चेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ही भेट घेतली, परंतु या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष नाराज झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने शिवसेना-राष्ट्रवादीला हे रुचले नाही.
राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे काँग्रेसला वाटते म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, परंतु फडणवीसांनी काँग्रेससमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला तो म्हणजे मागील अधिवेशनात भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. या आमदारांचे निलंबन रद्द करावे, असा प्रस्ताव फडणवीसांनी काँग्रेसला दिला आहे, परंतु हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे. काँग्रेस एकटी यावर निर्णय घेऊ शकणार नाही, परंतु फडणवीसांनी हा प्रस्ताव देऊन काँग्रेसची गोची केली आहे, तर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या संख्याबळावर विश्वास नाही का? असं इतर पक्षातील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी पसरल्याची माहिती आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …