खोपोली : प्रतिनिधी
मागील दहा दिवसांपासून खोपोली नगरपालिका क्षेत्रात दैनंदिन नवीन कोरोना रुग्णसंख्या पंधराच्या खाली येऊन स्थिरावली आहे. एका बाजूला चाचण्या वाढल्या असून, नवीन रुग्णसंख्या स्थिर असल्याने नागरिक व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील दैनंदिन व्यवहार व औद्योगिक क्षेत्रातील कामकाजही नियमांचे पालन करून पूर्ण क्षमतेने सामान्यपणे सुरू झाले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांनाही गती मिळाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दररोज वाढ होणार्या खोपोलीतील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येत आहे. दिवसाला पंधरापेक्षा कमी नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. तसेच दहा दिवसांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, येथील खासगी कोविड रुग्णालयांवरील भार कमी झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी ही रुग्णालये खुली झाली आहेत. सर्वपक्षीय नेते, नगरपालिका व सार्वजनिक प्रयत्नातून खोपोलीत पन्नास बेडचे मोफत उपचार कोविड सेंटरही कार्यान्वित झाले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शहरातील बाजारपेठेसह अन्य सेवा व उद्योग, व्यवसायही सामान्य होत आहे. स्थिती सामान्य होत असली तरी, संभाव्य तिसरी लाट व त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून खोपोली नगरपालिका प्रशासनाने तपासणी मोहीम कायम ठेवली आहे. पावसाळी पर्यटक व बाजारात आलेल्या नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. मागील पाच दिवसात या अँटीजेन तपासणीत एकही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आलेली नाही.
रुग्णसंख्या स्थिर आहे. तरीही खबरदारीची उपाययोजना कायम ठेवण्यात आली आहे. अँटीजेन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. बाजारातील गर्दी रोखण्यासाठी व कोरोनाविषयक नियमांचे पालन होण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
-सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली