Breaking News

पाच दिवसांच्या हुलकावणीनंतर रायगडात पावसाची दमदार हजेरी

अलिबाग : प्रतिनिधी

हवामान खात्याच्या अंदाजाला पाच दिवस हुलकावणी देणार्‍या पावसाने बुधवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागात पावसाची संततधार सुरू होती. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. बुधवारी सकाळीदेखील पावसाचा जोर कायम होता. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या समुद्र किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. तर महाड, पोलादपूर, पेण, रोहा, माणगाव तालुक्यातही चांगला पाऊस झाला. या पावसाने काही ठिकाणी सखल भागात तसेच इमारतींच्या आवारात पाणी साचले. अलिबाग शहरातील प्रवेशव्दारावर, बायपास मार्गावर पाणी साचले होते. त्यातून वाहनचालकांना आणि पादचार्‍यांना वाट काढावी लागत होती. पावसाबरोबरच गारवारा सुटल्याने हवेत गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारव्याचा सुखद अनुभव मिळत आहे. बुधवार सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला. हवामान खात्याने दुपारी 1 नंतर जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र तो फोल ठरला. कर्जत, खालापूर तालुक्यात मात्र पाऊस बरसला नाही. तेथे किरकोळ सरी वगळता दिवस कोरडाचा गेला. दुपारी चक्क ऊन पडल्याचे पहायला मिळाले. मागील पाच दिवसात अतिवृष्टीचा इशारा असूनही पावसाने पाठ फिरवली होती. त्यातच हवामान खात्याने रायगडचा ग्रीनझोनमध्ये समावेश केल्याने रायगडकर काहीसे निर्धास्त झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पावसामुळे मंदावली होती. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, काळ या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. मात्र त्यांनी इशारा पातळीदेखील ओलांडली नाही. बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 63.25 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

तालुकावर पाऊस (मिमी)

अलिबाग – 74 ,

पेण – 13,

मुरूड – 150,

पनवेल – 2.40,

उरण – 11,

कर्जत – 35,

खालापूर – 53,

माणगाव – 48,

रोहा- 107,

सुधागड – 23,

तळा – 71,

महाड – 48,

पोलादपूर – 57,

म्हसळा – 96,

श्रीवर्धन – 213,

माथेरान – 10.60

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply