पोयनाड येथील जाहीर सभेस प्रतिसाद
श्रीगाव : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील आघाडीचे नेतृत्व करणारे नेते स्वार्थी आहेत. गेले अनेक वर्षे सत्ता उपभोगून केवळ स्वतःचा विकास करीत रायगडच्या ग्रामीण भागात विकासाला खीळ बसवली. जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या व औद्योगिक विकास करण्यासाठी रायगडच्या जनतेने सज्ज होऊन स्वार्थी नेत्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचे आयोजन पोयनाड येथे करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक मुद्द्यांवर चर्चा केली. या वेळी व्यासपीठावर अलिबाग, मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सतिश धारप, शिवसेनेचे माजी रायगड जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, राजिपचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेची अनेक वर्षे सत्ता असणार्या नेत्यांना खारेपाटातील जनतेला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. खारेपाटातील जनतेला तातडीने पाणी मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून पुढील एक वर्षापर्यंत खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यात शासनाच्या माध्यमातून औद्योगिक प्रकल्प येणार आहेत. या प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्याने न्याय देणार आहोत. प्रकल्पांत स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याची खबरदारी घेण्याबरोबरच वडखल धरमतरस्थित जे. एस. डब्ल्यू कंपनीत अलिबागमधील 200 जणांना कामाला लावण्यासाठी प्रयत्न करणार असून, बेरोजगार युवकांनी तातडीने आपले बायोडाटा जमा करावेत, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.