Breaking News

द्रोणागिरी किल्ल्याची प्रवेशद्वार भिंत ढासळली

उरण : वार्ताहर             

रायगड जिह्यातील उरण येथील ऐतिहासिक किल्ले द्रोणागिरीचे प्रवेशद्वाराची भिंत आणि चर्चवरील भाग 13 जून रोजी ढासळला. ही घटना अत्यंत गंभीर असून असे होत राहिले तर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होण्याची भीती आहे. द्रोणागिरी किल्ला हा असंरक्षित स्मारक आहे. किल्ल्यावर जाणार्‍या वाटा पावसाळ्यात बिकट होत आहेत. तसेच सध्या किल्ल्यावरील चर्च, तटबंदी, बुरुज आणि पाण्याचे टाके, हौद या ऐतिहासिक (हेरीटेज) वास्तू आहेत. या किल्ल्याचा डोंगर हा ओएनजीसी आणि वन विभाग यांच्यात विभागला असून दोन्हीकडून दुर्ग अवशेष संवर्धन होत नाहीत, तसेच यांच्या हद्दीचे फलक कोठेही लावण्यात आलेले नाहीत. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था द्रोणागिरीवर गेल्या सहा वर्षांपासून दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. यादरम्यान वन विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि राज्य पुरातत्व विभाग यांना किल्ल्याच्या वास्तूंची होणारी पडझड छायचित्रे व पत्रे देण्यात आली आहेत, परंतु यावर अद्याप कोणतीही कारवाई किंवा पाऊले उचलण्यात आलेले नाहीत. या किल्ल्यावरील दुर्ग अवशेष राज्य पुरातत्व विभाग अंतर्गत संरक्षित करण्यात यावे असे पत्रही संचालकाना देण्यात आले होते, परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. योग्य वेळी कारवाई झाली नाही म्हणून आज किल्ल्याच्या वास्तू पडझड होत असून याला शासकीय अकार्यक्षमता जबाबदार आहे. या विषयात झालेला निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष याला जबाबदार कोण याची राज्य शासनाने चौकशी करावी. शासकीय अकार्यक्षमतेमुळे आज रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्याची पडझड मोठ्या प्रमाणत होत आहेत. यासंदर्भात संस्थेमार्फत संचालक, सहायक संचालक (राज्य पुरात्तव विभाग), उरण तहसीलदार, रायगड जिल्हाधिकारी, वन विभाग, रायगड, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्रे देण्यात आली असून त्यांनी या विषयात लक्ष घालून पडझड झालेली वास्तू ही राज्य पुरातत्व निकषाने लवकरात लवकर डागडुजी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ही माहिती संस्थेचे दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली. भविष्यात जर पूर्ण किल्ला ढासळला तर हा रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा धोक्यात येईल अथवा नष्ट होऊ शकतो. अशी भीती संस्थेचे उरण विभाग प्रमुख अभिषेक ठाकूर यांनी व्यक्त केली.

असा आहे इतिहास

उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधण्यात आला. द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.1530 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. 1535मध्ये अंतोनो-दो-पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. 16व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्त्वाचा होता. 10 मार्च 1739ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आजही गडावर दिसतात. तेथे एक चर्च आहे. येथे असलेल्या मूर्ती शिलालेखशिवाय आहेत. चर्च आतल्या तटबंदीमध्ये आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या दक्षिणेस 50 मीटर अंतरावर आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply