पनवेल : वार्ताहर
तळोजा फेज-1 येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडावर दफनविधी त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बहुजन वंचित विकास संस्थेच्या पदाधिकार्यांसह भेट घेतली. या वेळी दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाविषयी विस्तृत चर्चा झाली व त्याची वस्तुस्थिती सन्मान आयुक्त महोदयांना कथन केले. दफनभूमीसाठी आरक्षित असलेला भूखंड सिडकोकडून अद्यापही महापालिकेकडे हस्तांतरित केला गेला नाही. या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी सिडकोच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या आहेत. काही जाचक अटी सिडकोकडून यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने ही प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. या विषयात आयुक्तांनी सिडकोला पुन्हा एकदा पत्र देऊन भूखंड त्वरित हस्तांतरित करण्याविषयी सूचित करावे, अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली. या वेळी त्यांनी हा विषय मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष अस्लम हनिफ खोत आणि जनरल सेक्रेटरी इक्बाल नावडेकर उपस्थित होते.