Breaking News

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक; एनआयएची मोठी कारवाई

मुंबई ः प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना गुरुवारी (दि. 17) अटक केली. या प्रकरणात सचिन वाझेंनंतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील दुसरे मोठे अधिकारी आहेत. त्यांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएने गुरुवारी सकाळीच प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास शर्मा यांना अटक करण्यात आली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. ही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणात एनआयएने सविस्तर तपास केल्यानंतर हिरेन यांची हत्या झाली असून त्यामध्ये सचिन वाझे यांच्यासह मुंबई पोलिसातील दोन कर्मचारी आणि एक बुकी यांचा हात असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानुसार त्यांना एनआयएने अटक केली. त्यानंतर आता शर्मा यांच्या अटकेची झालेली ही मोठी कारवाई ठरली आहे. प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएने सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर 7 आणि 8 एप्रिल रोजी एनआयएने  शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. या वेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी वाझे यांना त्यांच्यासमोर आणूनदेखील चौकशी केल्याचे सांगितले गेले, पण त्या वेळी शर्मा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर गुरुवारी शर्मा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर दुपारी एनआयएने त्यांना अटक केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply