काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले बरसले
मुंबई ः प्रतिनिधी
आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कोणाला त्रास का व्हावा, असा सवाल करतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती जाहीर करावी. त्यांना युतीच्या शुभेच्छा देतो, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगपाखड केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू असून आता तर आघाडीतील नेते एकमेकांना ललकारू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढती जवळीक त्याचे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सर्वच ठिकाणी काँग्रेसला डावलले जात असल्याच्या भावनेतून प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आगामी निवडणुका पक्ष स्वबळावर लढेल, असे म्हटले होते. पटोलेंच्या या स्वबळाच्या नार्यावरून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमातून टीका केली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनामधूनही पटोले यांना लक्ष्य करण्यात आलेे. त्याला आता पटोले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनेच नाही, तर शिवसेनेनेही दिला आहे, पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचे काम सुरू आहे. मी ‘सामना’ वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करीत असेल तर आम्ही त्याला महत्त्व देत नाही, असे पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती जाहीर करावी. त्यांना युतीच्या शुभेच्छा देतो, असेही म्हटले.