Breaking News

सूडबुद्धीचा गजर

शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानांवर गुरूवारी ईडीचे छापे पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पित्त खवळणे स्वाभाविकच होते. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यानंतर नेहमीप्रमाणे सूडबुद्धीच्या कारवाईचा राग आळवला. मविआ नेत्यांना आता असे म्हणण्याची सवयच जडली आहे. ईडीची कारवाई होताक्षणी त्यांचा सूडबुद्धीच्या कारवाईचा गजर सुरू होतो.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये ज्याची बरेच दिवस कुजबुज होती, ते अखेरीस घडले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी गुरुवारी पहाटे सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले. सरकारी बंगल्यासोबतच त्यांच्या वांद्रे येथील घरातही दिवसभर कारवाई सुरू राहिली. महाराष्ट्रात एकंदर सात ठिकाणी ईडीने कारवाईचा फास आवळला असल्याचे समजते. हे कधीतरी घडणार याची कुजबुज राजकीय वर्तुळात होतीच. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे महाविकास आघाडीचे दोन ज्येष्ठ मंत्री यापूर्वीच गजाआड झाले आहेत. आता अनिल परब यांचा नंबर लागणार अशा प्रकारचे भाकित केले जात होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरिट सोमय्या यांनी तर महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगण्याचा जणु विडाच उचलला आहे. गुरूवारच्या कारवाईनंतर अनिल परब यांच्या विरोधातील पुराव्यांची बाब एका वार्ताहराने काढताच संजय राऊत म्हणाले की तांत्रिक तपशीलांची मला माहिती नाही. त्यांच्या या वक्तव्याला हसावे की रडावे तेच कळत नाही. कारवाई कोणत्या गोष्टींच्या आधारे झाली हे समजून घ्यायचे नसेल तर बोलणेच खुंटते. ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक असेल तर भक्कम पुरावे देऊन हे आरोप फेटाळणे योग्य ठरेल. नुसतेच सूडबुद्धी, सूडबुद्धी असे ओरडणे योग्य होणार नाही. या आधीही महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री गजाआड गेले आहेत. जनतेचे पाठबळ असते तर त्यांच्या अटकेनंतर किती गदारोळ झाला असता याची कल्पनाच केलेली बरी. परंतु तसे काही घडले नाही. इतक्या कारवायांनंतर देखील आपल्याबद्दल जनतेत सहानुभूती का निर्माण होत नाही याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गंभीरपणे विचार करायला हवा आहे. अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. न्यायालय त्यावर यथावकाश योग्य तो निवाडा देईलच. त्यांच्या विरोधातील कारवाईसाठी आताचा मुहुर्त का निवडला असा सवाल केला जात आहे. वास्तविक किरिट सोमय्या यांनी कित्येक महिने आधीपासून परिवहन मंत्री परब यांना लक्ष्य केले होते. परब यांच्यासह अंधेरीतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्यावर देखील ईडीने कारवाई केली असून ते परब यांचे निकटवर्तीय समजले जातात. अनिल परब यांच्यावरील कारवाई सत्ताधारी आघाडीने गांभीर्याने घेतलेली बरी कारण एका अर्थी शिवसेनेला या घडामोडी नजिकच्या भविष्यकाळात कमालीच्या त्रासदायक ठरू शकतात. अनिल परब यांनी देखील आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी असे किरिट सोमय्या म्हणाले, त्याला बराच अर्थ आहे. परब यांच्यावरील ही कारवाई शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो. दापोली येथील कथित बेकायदा रिसॉर्ट आणि मनी लॉड्रिंगच्या आरोपांखातर ईडीने ही कारवाई सुरू केल्याचे सांगण्यात येते. ईडीच्या छाप्यांचे गांभीर्य निदान परिवहन मंत्री अनिल परब यांना तरी जाणवले असेल अशी अपेक्षा. निव्वळ सूडबुद्धीच्या गजराने काहीही हाती लागणार नाही याचे भान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठेवलेले बरे.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply