Breaking News

नागरिकांचा मुक्तसंचार वाढल्याने रुग्णवाढ; कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण, नवी मुंबईत आठवडाभरात 658 नवे पॉझिटिव्ह

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना संसर्गाने संपूर्ण जग ग्रासले आहे. कोरोनाचा संसर्ग काही काळ घटतो आणि पुन्हा वाढतो. यामध्ये नियमांचे पालन करून काळजी घेणे गरजेचे असतानाही कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर नागरिकांचा मुक्तसंचार सुरू झाला आहे आणि हा मुक्तसंचार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रण देईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिकांची मुक्तसंचार वाढत कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरली होती. आताही शहरात गर्दीच्या ठिकाणी मुक्तसंचार वाढू लागल्याने रुग्णवाढीचा धोका कायम आहे. रविवारी एकाच दिवसात शहरात 135 रुग्ण सापडले असून आठवडाभरातील रुग्णांची संख्या ही 658 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका प्रशासनाने वर्तवला आहे. नवी मुंबई कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उपचाराधीन रुग्णांची संख्या 12 हजारांपर्यंत गेली होती तर दैनंदिन रुग्णांची संख्या 1400 पर्यंत गेली होती. शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांनंतर ही परिस्थिीती आटोक्यात आली होती. त्यामुळे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारापर्यंत खाली येत दैनंदिन रुग्णांची संख्याही 50 ते 60च्या घरात स्थिरावली होती. यामुळे शहरातील निर्बंध उठविण्यात आले होते. निर्बंध उठविल्यानंतर काही दिवस दैनंदिन रुग्ण स्थिर होते, मात्र शहरात मुक्तसंचार वाढल्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. 17 जूनला तीन हजार 700 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या यात 111 रुग्ण आढळले होते. तर 18 जूनला 4 हजार 600 चाचण्या करण्यात आल्यानंतर 93 रुग्ण आढळले होते. 19 जूनला दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत ती 31 पर्यंत खाली आली होती, मात्र 20 जून रोजी दैनंदिन रुग्णांत वाढ होत 135 रुग्ण सापडले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. निर्बंध उठविण्यात आल्यानंतर शहरात कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येही सामाजिक अंतराचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे तर दुकाने, भाजी मार्केट, मॉल या ठिकाणीही भरमसाट गर्दी होताना दिसत आहे. शनिवारी व रविवारी मॉल तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहेत. कोरोनाच्या दोन लाटा अनुभवल्यानंतरही नागरिकांच्या हनुवटीखालीच मुखपट्टी दिसत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका प्रशासनाने वर्तवला आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रुग्णवाढ कायम राहिल्यास निर्बंध लागू करावे लागतील असा इशारा दिला आहे.

संशयित नागरिकही घराबाहेर

नवी मुंबईतील चारही मोठ्या मॉलमध्ये गेल्या तीन दिवसांत 12253 प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या असून यात 17 जण पॉझिटिव्ह व 50 जण संशयित आढळले. नागरिक संशयित असूनही घराबाहेर पडत आहेत. लक्षणे असताना घराबाहेर न पडता विलगीकरण करून घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढले

तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका वर्तवला जात आहे. रुग्णवाढ कमी झाली असली तरी लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही बाजारपेठा, मॉल किंवा फेरफटका मारताना नागरिक लहान मुलांना घेऊन जात आहेत. त्यात काहीजण त्यांची सुरक्षाही पाळताना दिसत नाहीत.

शहरात बहुतांश व्यवहार शासनाच्या निर्देशानुसार नियमानुसार सुरू झाले आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बेफिकिरीमुळे तिसर्‍या लाटेला आपण आमंत्रण देत आहोत. कोरोनाचा धोका संपला नसून अधिक मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा.

-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply