Breaking News

भातशेतीचे क्षेत्र होतेय कमी

उरणमध्ये 11 हजारांपैकी फक्त अडीच हजार हेक्टरवर लागवड

उरण : रामप्रहर वृत्त

पन्नास वर्षांपूर्वी उरण तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर येथे अनेक उद्योग तसेच नागरिकरण वाढत गेल्याने हळूहळू भातशेतीचे क्षेत्र कमी होत गेले. आता तालुक्यात 11 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त दोन हजार सेक्टरवर भात व इतर पीक घेतले जात आहेत. ज्या वेगाने शेती क्षेत्र घटत आहे, त्यावरून पुढील काळात तालुक्यात भातशेती संपणार असल्याचे दिसत आहे.

उरण तालुक्यातील शेतीचे एकूण क्षेत्र हे 11 हजार 38 हेक्टर असून यापैकी सध्या केवळ दोन हजार 542 हेक्टर जमिनीवरच शेतीपीक घेतली जातात. यात 167 हेक्टर आंबा व 156 हेक्टर जमिनीत रब्बीचे पीक घेतले जात असून उर्वरित क्षेत्रावर भातपीक घेतले जात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

उरण तालुक्यात परंपरागत भातशेती आणि तीही केवळ पावसावर अवलंबून असलेली एक शेती केली जात आहे. येथील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन हे शेती हेच होते. शेतीची लागवड करून ते पिकल्यानंतर त्याची विक्री करून घर व इतर खर्च भागविणे हीच पद्धत होती. त्यामुळे शेतीवर अधिक भर दिला जात होता. एकराला दोन ते तीन खंडी भात पिकवला जात होता. त्यासाठी जोडीने (एकमेकांच्या शेतावर काम करण्याची पद्धत) होती. त्यामुळे खतांशिवाय इतर कोणताही खर्च नव्हता. शिवाय भात झोडणीनंतर तयार झालेल्या पेढ्यांचीही विक्री केली जात होती. उरण तालुक्यातील एकूण 16 हजार 847 हेक्टर क्षेत्र असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. यातील खारफुटी व मिठागरांची जमीन वगळता बहुतेक ठिकाणी भातशेतीच केली जात होती.

भाताच्या साठवणुकीसाठी प्रत्येकाच्या घरात स्वतंत्र जागा होती. अशा या भात पिकाच्या उत्पन्नावर आधारित जीवनशैलीत पन्नास वर्षांपूर्वी आलेल्या औद्योगिकीकरण खासकरून सिडकोमुळे बदल झाले आहेत. उरणमधील पश्चिम विभागात मोठ्या प्रमाणात उद्योगांची उभारणी झाली आहे. तर पूर्व विभागातही उद्योगनिर्मिती होत असल्याने भातशेती नष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे भाताचे कोठार म्हणून परिचित असलेल्या उरणची ओळख आता औद्योगिक शहर म्हणून होत आहे.

‘विक्रमी पीक येत होते’

उरण तालुक्यात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने उरण तालुक्यात दरवर्षी विक्रमी भाताचे पीक येत होते. भाताच्या याच पिकावर बारा बलुतेदारी पद्धतीने भाजी, मासळी आदीची खरेदी केली जात असल्याची तसेच अनेकांची लग्ने ही भाताच्या विक्रीतून केली जात होती, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक तुळशीराम पाटील यांनी दिली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply