Breaking News

`दिबां`च्या नावासाठी जनसागर उसळला

  • राज्य सरकारला 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम
  • अन्यथा विमानतळाचे काम बंद पाडण्याचा सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे; अन्यथा दुसर्‍या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 24) लाखो आंदोलकांच्या साक्षीने सिडकोसह राज्य सरकारला देण्यात आला. या वेळी ‘दिबां’च्या जयजयकाराच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण आसमंत दणाणून गेले होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, या मागणीसाठी बेलापूर येथील विराट सिडको घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व जाती-धर्मांचे समाज, विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नागरिक आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेऊन ‘जय दिबा’ असा एल्गार केला आणि ‘फक्त दिबा’ म्हणत दुसरे नाव दिले गेले तर 1984पेक्षा मोठा क्रांती लढा होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सन 2008पासून होत आहे, मात्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी व भूमिपुत्र जनतेच्या भावना जाणून न घेता मागणी केली आणि कोरोनाची भयावह परिस्थिती असतानाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने धिसाडघाईने केला. त्यामुळे नामकरणाचा वाद निर्माण झाला आणि तो चिघळलाही. या प्रकल्पाचे लोकनेते दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा आग्रह भूमिपुत्रांनी, स्थानिकांनी धरलेला आहे, मात्र ठाकरे सरकारने हेकेखोरपणा केल्याने भूमिपुत्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद या आंदोलनात दिसून आले. या वेळी अनेकांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.
सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीतून निघून गेल्याने कृती समितीने 24 जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला होता आणि त्या अनुषंगाने लाखो आंदोलकांच्या सहभागाने भव्यदिव्य आंदोलन झाले. या आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार तथा माजी खासदार जगन्नाथ पाटील, काँग्रेस नेते व माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, रविशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, समितीचे कार्याध्यक्ष आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, महेश बालदी, गणपत गायकवाड, राजू पाटील, किसन कथोरे, रमेश पाटील, मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, संदीप नाईक, योगेश पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, मयुरेश कोटकर यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्ष, संघटना, वारकरी सांप्रदाय, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक हे रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, शहापूर, नाशिक, कल्याण, डोंबिवली आदी भागांतून लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पूर्वतयारीपासून ते आंदोलन होईपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी उत्तम प्रकारे नियोजन सांभाळले. ते स्वतः व्यापीठावर न बसता त्यांनी आंदोलकांसमवेत बसून चैतन्य निर्माण केले.
दरम्यान, शिष्टमंडळाने सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासंदर्भात केलेला ठराव रद्द करावा आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवीन ठराव करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने सिडकोकडे केली.
…तर 1984पेक्षा मोठी क्रांती घडेल -दशरथ पाटील
भूमिपुत्रांसाठी संपूर्ण आयुष्य ‘दिबां’नी वेचले. सन 1984चा लढा असो किंवा इतर लढे. अशा अनेक लढ्यांत त्यांचे मोलाचे योगदान आहे. 1958 साली कुळ कायदा पॅटर्नमुळे देशात न्याय प्रस्थापित झाला. त्यामुळे ‘दिबा’ देशाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1984च्या लढ्यात मी, लोकनेते रामशेठ ठाकूर, दत्तूशेठ पाटील अशा अनेक जणांनी सहभाग घेतला. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि वैचारिक प्रगल्भतेतून त्यांनी संपूर्ण आयुष्य बहुजन समाजासाठी वाहिले. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त ‘दिबां’चेच नाव देण्यात यावे. दुसरे नाव दिले तर 1984च्या पेक्षा मोठी क्रांती घडेल, असा इशारा या वेळी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिला.
 ‘दिबां’च्या नावाशिवाय पर्याय नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर  
वंदनीय ‘दिबा’साहेबांनी सर्व समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यांच्या नावासाठी सर्व समाज एकवटला आहे. 99 टक्के समाज आणि विविध पक्ष, संघटना, संस्था, सांप्रदाय ‘दिबां’च्या नावासाठी आग्रही आहे. 70पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हा उत्साह कायम ठेवा. सरकारला ‘दिबा’साहेबांचे नाव दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही. सिडकोने ठराव बदलून ‘दिबा’साहेबांच्या नावाचा करावा आणि राज्य सरकारला पाठवावा, असे सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सूचित केले.
‘दिबां’चे नाव मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवून जिंकायचाय -आमदार प्रशांत ठाकूर
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव डावलून भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. सन 2008पासून ‘दिबां’च्या नावाची मागणी असतानाही ठाकरे सरकारने प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विमानतळाचे काम पूर्ण नसतानाही आणि कोविडचे भयंकर संकट असतानाही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी आणि तत्काळ ठराव भूमिपुत्रांच्या माथी मारण्याचे प्रयोजन राज्य सरकारने केले, परंतु ‘दिबां’ची आण घेऊन रायगडपासून मुंबई ते अगदी नाशिकपर्यंतचे ‘दिबा’समर्थक या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे नुसती हाक दिली आणि ‘दिबां’च्या नावासाठी जनसागर एकवटला आहे. असे असले तरी जोपर्यंत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला सुरूच ठेवून जिंकायचा आहे, असे आवाहन या वेळी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
‘मविआ’कडून भीतीपोटी ठरावाचा घाट -आमदार महेश बालदी    
महाविकास आघाडीचे हे सरकार उद्या असेल की नसेल हे त्यांना माहीत नाही आणि म्हणूनच त्या भीतीपोटी ठराव करून बाळासाहेबांचे नाव देण्याचा घाट घातला आहे. वाढीव गावठाण पक्के करण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून मागणी आणि संघर्ष सुरू आहे, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या संदर्भात मागणीपत्र देऊन प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देण्याचा ढोंगी प्रयत्न सुरू केला आहे, मात्र त्याला प्रकल्पग्रस्त भूलणार नाहीत. राज्यात अनेक प्रकल्प आहेत. त्यातील 10 प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे, या मागणीचा पुनरूच्चार सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य आमदार महेश बालदी यांनी केला.  
भूमिपुत्रांबद्दल मुख्यमंत्र्यांना आपुलकी नाही -रवींद्र चव्हाण
लोकनेते दि. बा. पाटील यांनी तत्कालीन सरकारच्या विरोधात आंदोलने करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला. माझी जन्मभूमी मुंबई असली तरी माझी कर्मभूमी कोकण आहे आणि येथील प्रत्येक माणूस ‘दिबां’चा आहे, मात्र भूमिपुत्रांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जराही आपुलकी नाही. ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्याशिवाय भूमिपुत्र गप्प बसणार नाहीत, असे सांगत माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांनी वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले.
भूमिपुत्रांना डिवचू नका, तो बंदुकीलाही घाबरत नाही  -काँग्रेस नेते हुसेन दलवाई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहिले. स्वर्गात त्यांनाही ‘दिबा’साहेबांचे नाव मान्य असेल. ते उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात येतील आणि त्यांना सांगायचे ते सांगतीलच. ‘दिबा’ फक्त भूमिपुत्रांचा विचार करायचे. विमानतळ होतेय ही भूमिपुत्रांची मेहरबानी आहे. त्यामुळे भूमिपुत्राला विसरू नका आणि हे पाप करू नका. बाळासाहेब, बॅ. अंतुले यांचे स्मारक भव्यदिव्य व्हावे, पण नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव मिळावे. येथील भूमिपुत्र शांत आहे, मात्र तुम्ही त्याला डिवचले तर तो बंदुकीलाही घाबरत नाही. त्यामुळे सन्मानाने चर्चा करा, मार्ग काढा. लोकनेते
रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात एकवटली आहेत आणि या लढ्यात दशरथदादांना सहभागी करून त्यांनी या खर्‍या लढाऊ वाघाला जिवंत केले आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते व माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आमच्या हृदयात आहे, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे. आज भूमिपुत्र म्हणून आलो आहे, पक्ष भावना बाजूला आहे. मी बाळासाहेबांच्या रोज पाया पडतो, मात्र ‘दिबां’चे योगदान नवी मुंबईत मोठे आहे. त्यामुळे त्यांचेच नाव दिले पाहिजे.
-सुभाष भोईर, माजी आमदार, शिवसेना

आंदोलनाची परिस्थिती आणून विखुरलेला आमचा समाज एकत्र करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, पण विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागले पाहिजे आणि त्यासाठी समाज काहीही करेल व ते तुम्हाला दिसेलच. आम्हाला संघर्ष करायचा नसून आमची ताकद दाखवायची आहे.
-राजू पाटील, आमदार, मनसे

मिळेल त्या वाटेने भूमिपुत्र आंदोलनस्थळी
सकाळी लवकरच आंदोलक मिळेल त्या वाटेने नवी मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी अनेक ठिकाणांहून पोलीस येऊ देत नाहीत, आम्हाला अडवले आहे, असे फोन येत असल्याने कितपत गर्दी होणार अशी शंका व्यक्त होऊ लागली होती, पण 11.15नंतर आंदोलकांचे लोंढे येऊ लागले. पनवेल, उरणसह रायगड तसेच नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक आदी विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र जमा होऊ लागले. अगदी सर्वपक्षीय कृती समितीचे शिष्टमंडळ निवेदन देऊन आले तरी आंदोलक सभास्थानी येतच होते. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीसही अवाक् झाले.
दिंडी, आदिवासी नृत्य आणि ‘दिबां’चा गजर
वारकरी सांप्रदायातील भूमिपुत्र मंडळी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचा जयघोष करीत आंदोलनस्थळी येत होते. हाती टाळ, मृदंग, वीणा घेऊन ते ‘दिबां’च्या कार्याची ओळख करून देत त्यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी करीत होते. यामध्ये महिलाही मागे नव्हत्या. डोक्यावर तुळसी वृंदावन घेऊन त्या ‘दिबां’च्या या अनोख्या वारीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या, तर वसईतील आदिवासी समुदायातील लोकांनी आपले पारंपरिक नृत्य सादर करीत लक्ष वेधून घेतले.
लहान मुले, तरुण, आजोबा सर्वांचाच सहभाग
प्रकल्पग्रस्तांचे अध्वर्यू लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांना न्याय्य हक्क मिळवून दिल्याने आज त्यांची मुले शिकली. म्हणूनच समाजाची आर्थिक स्थितीही सुधारली. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्यावे, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लहान मुले, तरुण, वृद्ध अशा सर्वांचाच आंदोलनात सहभाग पाहावयास मिळाला. ठाण्यातील बाळकुंभ पाडा येथील सई आकाश पाटील ही सुमारे 10 वर्षांची चिमुरडी सायकलवरून नवी मुंबईत आंदोलनस्थळी आली होती, तर चौकचे 70 वर्षीय यशवंत सकपाळ हे कळंबोलीपासून चालत बेलापूरला पोहचले.
आंदोलनातच महिलांची वटपौर्णिमा साजरी
वटपौर्णिमा हा महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा सण. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वटवृक्षाची पूजा करून त्या उपवास करतात. यंदाच्या वटपौर्णिमेला भूमिपुत्र महिला या नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी तेथेच वटवृक्षाची पूजा केली. या वेळी भाजप महिला मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे यांनी सांगितले की, आज वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने वडाची पूजा करून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. त्या सावित्रीच्याच आम्ही लेकी आहोत आणि आम्हीही विमानतळाला ‘दिबां’चे नाव मिळवल्याशिवाय राहणार नाही. इतर महिलांनीही असाच निर्धार केला.
पित्याच्या नावासाठी महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती मोडीत काढली -जगन्नाथ पाटील  
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन बैठक झाल्या. 20 जूनच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे वागणे अत्यंत चुकीचे होते. बालहट्टाप्रमाणे ते वागले आणि बैठकीतून उठून गेले. आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी वेदनादायी घटना घडली नसेल, पण उद्धव ठाकरे यांनी ती केली. हडलप्पी करीत पित्याच्या नावासाठी महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती मोडीत काढली. महाराष्ट्राची परंपरा आई-वडिलांचे नाव देण्याची नाही हे लक्षात घ्या आणि लक्षावधी भूमिपुत्र जागरूक झाले आहेत हेही ध्यानात ठेवा, असे सर्वपक्षीय कृती समितीचे सल्लागार व माजी खासदार जगन्नाथ पाटील यांनी म्हटले.
आम्ही आमचा हक्क मागत आहोत, भीक नाही- आमदार मंदा म्हात्रे  
प्रकल्पासाठी आणि देशाच्या विकासासाठी आमच्या शेतकर्‍यांनी पिकत्या जमिनी दिल्या आहेत. आमच्या घराच्या भिंती, गाड्या ‘दिबा’साहेबांच्या आशीर्वादामुळे आहेत. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये. ‘दिबां’चे कार्य महान आहे. विधिमंडळात 2019मध्येच विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, ही मागणी मी केली आहे. आम्ही आमचा हक्क मागत आहोत, भीक मागत नाही, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको आणि राज्य सरकारला सुनावले.  
मुख्यमंत्री पक्षाचा नसतो, तर जनतेचा असतो -आमदार रमेश पाटील  
‘दिबां’नी भूमिपुत्रांसाठी त्याग केला आहे. ‘दिबां’च्या कार्याची उंची मोजण्याचे प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री पक्षाचा नसतो जनतेचा असतो. त्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय करू नका. ‘दिबां’च्या नंतर भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर करीत आहेत. वेळ पडल्यास यापेक्षा दहा पटीने आंदोलनकर्ते पुढच्या वेळी दिसतील, असे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीची हुकूमशाही -आमदार गणपत गायकवाड
‘दिबां’च्या नावाची मागणी होत असताना अचानक ठिणगी टाकण्याचे काम झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीची हुकूमशाही सुरू झाली आहे. त्यामुळे आता मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात त्यांच्या मुलांची नाव ठेवण्याची संस्कृती येईल. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्ही आंदोलन केले तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी धमकी देत सुटले. असे असतात का मुख्यमंत्री? हे मुख्यमंत्री आहेत ना. असे केले तर कसे राज्य चालवणार. भूमिपुत्रही शिवसैनिक आहेत हे लक्षात असू द्या. नाहीतर ठाणे, रायगडमध्ये शिवसेना उरणार नाही. मुख्यमंत्री महोदय खालच्या लोकांचे ऐकून वागाल तर आंदोलन करायला तुम्हाला भाड्याने लोकं आणावी लागतील, असे आमदार गणपत गायकवाड म्हणाले.
भूमिपुत्र वाघ आहेत हे लक्षात ठेवा -संतोष केणे  
भूमिपुत्रांनी या आंदोलनातून ताकद दाखवून दिली आहे. एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून तुम्हाला जाग आली नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला का? तुम्ही ठाण्याचे वाघ समजत असाल, पण भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा, असे काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे कडाडले.
त्रिमूर्ती आणि लोकप्रतिनिधींची ताकद पाठीशी -जगदिश गायकवाड
लोकनेते रामशेठ ठाकूर, दशरथदादा पाटील आणि जगन्नाथदादा पाटील या त्रिमूर्तींची आणि आजी-माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींची, विविध पक्ष, संस्था, संघटनांची, तरुण, महिला, ज्येष्ठांची ताकद भूमिपुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपले तरुण अजून तापले नाहीत. ते तापले तर राज्य सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत. भूमिपुत्रांनी घाबरण्याची गरज नाही. जिंकू किंवा मरू विमानतळाला ‘दिबां’चेच नाव देऊ. शिवसेनेला आगरी-कोळी समाजाने मोठे केले आहे. ‘दिबां‘चे नाव दिले नाही तर सोलल्याशिवाय राहणार नाही. मधल्या हरामखोरांनो भूमिपुत्र पेटून उठले आहेत हे याद राखा, अशा शब्दांत आरपीआय (आठवले गट)चे कोकण अध्यक्ष तथा पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी ‘दिबा’विरोधकांचा समाचार घेतला.
डोक्यावर बसवले तेच तुम्हाला पायदळी तुडवतील -प्रकाश म्हात्रे
उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही, पण नामकरणात या ठाकरे सरकारने तसेच केले आहे. जनतेने तुम्हाला डोक्यावर बसवले तेच तुम्हाला पायदळी तुडवतील हे लक्षात घ्या. तसे नको व्हायला तर विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या, असा गर्भीत इशारा ह. भ. प. प्रकाश म्हात्रे यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही ‘दिबां’च्या नावासाठी पाठिंबा जाहीर केला असून तसे पत्र आंदोलनात देण्यात आले.  
कशी ‘मविआ’ची थट्टा आज मांडली!
महाविकास आघाडीतील स्थानिक पुढार्‍यांनी सत्तेपुढे अक्षरशः नांगी टाकली. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांनी आघाडीच्या नेत्यांचे अक्षरशः वाभाडे काढले. परिणामी ‘कशी सत्तेने थट्टा आज मांडली,’ अशी परिस्थिती आघाडीच्या पुढार्‍यांची झाली आणि याची चर्चा रायगडपासून मुंबईपर्यंत रंगू लागली आहे.
‘दिबां’सोबत पाच हुतात्मे ‘त्यांना’ कधीच माफ करणार नाहीत!
‘हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते आणि ते वाया जाऊ द्यायचे नसते,’ असा लोकनेते दि. बा. पाटील यांचा लढवय्या बाणा होता आणि या एल्गाराच्या माध्यमातून लढे, आंदोलने सुरू राहिली. हे सारे केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशानेही पाहिले. याच संघर्षातून साडेबारा टक्क्याचा, साडेबावीस टक्क्यांचा निर्णय प्रस्थापित झाला. जे कुणालाही शक्य झाले नाही ते आपल्या नेत्याने करून दाखवले. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले. अशा ‘दिबां’च्या नावाला विरोध करणे म्हणजेच भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या दैवताला नाकारणे आहे आणि ती विरोधाची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली. त्यामुळे ‘दिबां’सोबत पाच हुतात्मे त्यांना कधीच माफ करणार नाहीत, अशी ज्वलंत प्रतिक्रिया आंदोलकांकडून व्यक्त झाली.
‘ती’ धमकी पोकळ ठरली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्ही आंदोलन कराल, तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, अशी धमकी कृती समितीला दिली होती. त्यांच्या आदेशाने स्थानिक शिवसेना पुढार्‍यांनी स्वतःची छाती बडवून घेत 24 जूनला आम्हीसुद्धा रस्त्यावर येणार, अशी गर्जना केली होती, मात्र त्यांची ही धमकी अक्षरशः पोकळ ठरली.
भूमिपुत्रांच्या जागेत घुसखोरी कशाला?
नवी मुंबई विमानतळ पूर्णत्वास यायला अद्याप किमान चार वर्षांचा कालावधी असताना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करीत पनवेल, उरणसह रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबईत वादाची ठिणगी टाकली. मुळातच ती अत्यंत चुकीची होती. कारण विमानतळाचे काम पूर्ण झाले नाही. वास्तविक शिवसैनिक म्हणून भूमिका घेण्यापेक्षा शिंदे यांनी राज्याचे एक जबाबदार मंत्री म्हणून स्थानिक, प्रकल्पग्रस्त तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे क्रमप्राप्त होते, मात्र तसे न करता वरिष्ठ नेत्यांची मर्जी राखण्यासाठी केलेला एक अट्टाहास असल्याचे चित्र आता जनतेसमोर स्पष्ट झाले आहे. मुळातच विमानतळाचे काम पूर्ण झाले नाही. त्याचप्रमाणे विमानतळबाधितांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काम सुरू असताना नामकरणाचा मुद्दा हा विषयच नव्हता, मात्र राजकारणात कुरापती काढणे काहींना सहज जमते. त्यातूनच हे प्रकरण घडवून आणले गेले. दुसरीकडे सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. मग मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या विमानतळाला स्व. बाळासाहेबांचे नाव देण्याचा आग्रह का धरला नाही? औरंगाबादचे संभाजीनगर अद्याप करता येत नाही. मग भूमिपुत्रांच्या जागेत का घुसखोरी करता, असा सवालही या वेळी या आंदोलनातून उपस्थित झाला आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply