कळंबोली : बातमीदार
कळंबोलीच्या सेंट जोसेफ विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण शाळा प्रशासन देत नाही. पनवेलच्या गट शिक्षण अधिकार्यांनी लेखी पत्र देऊनही शाळा प्रशासनाने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण असून याबाबत विद्यालयाच्या विरोधात पालक वर्ग आक्रमक भूमिका घेण्यासाठी सरसावले आहेत. याकरता बुधवारी (दि. 23) कळंबोलीतील कृष्ण मंदिरांमध्ये पालकांची सभा घेण्यात आली. या सभेचे नेतृत्व येथील नगरसेवक बबन मुकादम यांनी केले होते. कळंबोलीतील सेंट जोसेफ विद्यालय हे दरवर्षी येनकेनप्रकारे प्रकाश झोतात राहिले आहे. यावर्षी त्यांनी ज्या पालकांनी विद्यालयाची फी भरली नाही त्या पालकांचे व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण देण्याचे बंद केले आहे. कळंबोलीतील पालक वर्ग विद्यालयाची ट्युशन फी देण्यासाठी सर्वपोतरी तयार आहे, मात्र ट्युशन फी व्यतिरिक्त ज्या गोष्टी पालकांनी व विद्यार्थ्यांनी वापरल्याच नाहीत त्याचीही फी विद्यालय पालकांकडून वसूल करत असल्याने पालकांमध्ये सेंट जोसेफ विद्यालय प्रशासना विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यालयालाही कोणतीही व्यवस्थापन खर्च होत नसताना पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल केली जात असल्याने पालक वर्गांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. ज्या पालकांनी शाळेची फी भरली नाही त्यांना ऑनलाइन शिक्षण डिस्कनेक्ट केले गेल्याने पालकांच्या घरी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना विद्यार्थ्यांना पालकांनी नेमके उत्तर काय द्यायचे या विवंचनेत पुरता पालक वर्ग अडकला आहे, मात्र याचे सोयरसुतक सेंट जोसेफ प्रशासनाला काहीही नसून आमची फी भरा आम्हाला काही माहीत नाही असे प्रशासन सांगत असल्याचे पालकांनी सांगितले आहे. याबाबत पनवेलच्या प्रभारी गटशिक्षण अधिकार्यांनी पनवेलमधील शाळांना कडक भाषेत लेखी पत्र देऊन कुठल्याही विद्यार्थ्याचे फी भरली नाही म्हणून ऑनलाइन शिक्षण देण्याचे बंद करू नका, असे सज्जड लेखी आदेश बजावले असतानाही कळंबोलीतील सेंट जोसेफ मात्र शासनाचे प्रशासनाचे कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून शासनाच्या पत्राला केराची टोपली ते दाखवीत आहे. याबाबत शासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून पालकांकडून फक्त ट्युशन फी घेण्यात यावी अशी मागणी येथील नगरसेवक बबन मुकादम यांनी केली आहे. याबाबत सोमवारी शाळा प्रशासन तसेच गटशिक्षण अधिकार्यांकडे पालकांचे शिष्टमंडळ भेट देणार असून शाळा प्रशासनावर हजारो पालकांची धडक दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या फीवरून पालक शाळा प्रशासनाकडे गेले असता तक्रार करा आम्ही ती वरिष्ठांकडे पोहचवू, असेच उत्तर मिळत आहे.