पनवेल : वार्ताहर
पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा शुभारंभ नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दिवसेंदिवस फैलावणारा कोरोना आजार आणि ब्लड बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणारा रक्ताचा तुटवडा या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघर यांच्या सहयोगाने पोलीस मुख्यालय कळंबोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस बांधवांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. या वैश्विक संकटामध्ये आम्ही पोलीस सर्वोतोपरी संकटाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण सगळेच आप आपल्या परीने योगदान देत आहात असेच सहकार्य करा व आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन सर्वसामान्य नागरिकांना पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केले आहे.