खालापूर, खोपोली, पाली : प्रतिनिधी
नव्या वर्षातील एकमेव अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवारी (दि. 9) होती. यानिमित्त गणेशभक्तांनी अष्टविनायकांपैकी क्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड आणि पाली येथील मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. याशिवाय ज्यांना तिथे जाणे शक्य झाले नाही ते आसपासच्या मंदिरात जाऊन ते बाप्पाचरणी नतमस्तक झाले.
महड येथील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गणेशभक्तांची मांदियाळी होती. थंडीची तमा न बाळगता मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शन घेण्यास सुरुवात झाली. साधारणपणे वर्षातून दोन अंगारक संकष्ट चतुर्थी योग येत असतात, पण या वर्षी असा एकमेव योग असल्याने भाविकांनी गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेत नवीन वर्ष सुख, समाधानाचे व आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना केली.
पाली नगरीतही भाविकांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. पहाटेपासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. काही भाविकांनी पायी वारी करीत मंदिर गाठले व दर्शन घेतले. दर्शनानंतर भाविकांच्या चेहर्यावर आगळेवेगळे समाधान पहायला मिळाले. महडप्रमाणेच पालीतही भाविकांसाठी संस्थानच्या वतीने व्यवस्था करण्यात
आली होती. त्याचप्रमाणे पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली. याशिवाय असंख्य भाविकांनी आपापल्या परिसरातील गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी …