पनवेल : बातमीदार
सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून, कागदपत्रांमध्ये जोडून, तो खरा आहे असे भासवून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची 18 लाखांची फसवणूक केली आहे.
खारघर कोपरा येथील सेकटर 10 मध्ये राहणारे शिवराम प्रभाकर सुतार (वय 31 वर्ष) यांनी कोपरा, सेक्टर 10 येथील एकता कन्स्ट्रक्शनच्या सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा अशान यांच्याकडे रूम घेण्यासाठी पैशांची गुंतवणूक केली होती. या वेळी 2012 मध्ये त्यांनी 18 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम व बँकेतील लोन मंजूर करून बांधकाम व्यावसायिकाला दिले होते. बांधकाम व्यावसायिकाने दुय्यम सहनिबंधक कार्यालय पनवेल येथे त्यांना रूमचा दस्त नोंदणीकृत करून दिलेला आहे. या वेळी बांधकाम व्यावसायिकाने सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून सदर कागदपत्रामध्ये जोडून तो खरा आहे, असे भासवले असल्याचे सुतार यांच्या लक्षात आले, तसेच विकसक एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा यांनी रूमचे भोगवटा प्रमाणपत्र लवकरच भेटेल व लगेच सदर रूमचा ताबा मिळणार आहे, असे सुतार यांना सांगितले होते.
या बिल्डिंगचे काम पूर्ण झालेले असूनही सुतार यांना रूमचा ताबा न दिल्याने एकता कन्स्ट्रक्शनचे भागीदार सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा अशान यांना 2014 मध्ये सुतार यांनी वकिलांमार्फत नोटीस दिली होती. त्यानंतर सुतार यांनी सिडको कार्यालयामध्ये इमारतीबद्दल चौकशी केली असता सिडकोने सदर बांधकामास भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिलेला असल्याचे समजले. त्यामुळे रूम ताब्यात देणेबाबत बिल्डरकडे त्यांनी तगादा लावला असता बांधकाम व्यावसायिकांनी शिविगाळ करून त्यांना चेक बाऊन्सच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी सिक्युरिटीपोटी दिलेला चेक बँकेत टाकून चेक बाऊन्सची खोटी केस सीबीडी बेलापूर न्यायालयात दाखल केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जुलै 2019 मध्ये सुतार यांनी खारघर पोलीस ठाण्यात सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा अशान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.