अमेरिकेला टाकले मागे
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरेाना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असून सोमवार (दि. 28)च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसींचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ऐतिहासिक कामगिरी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
गेल्या आठवडाभरापासून म्हणजेच 21 जूनपासून देशात 18 ते 44 या वयोगटासाठीदेखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 83 लाख नागरिकांना लस देण्यात आली होती, तर आरोग्य मंत्रालयाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातील जगातील सहा देशांमधील आकडेवारी सादर केली.
भारतात सर्वाधिक (32,36, 63,297) लसीचे डोस देण्यात आले असून दुसर्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत सोमवारपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून 32 कोटी 33 लाख 27 हजार 328 डोस देण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ ब्रिटन (सात कोटी 67 लाख 74 हजार 990), जर्मनी (सात कोटी 14 लाख 37 हजार 514), फ्रान्स (पाच कोटी 24 लाख 57 हजार 288) आणि इटली (चार कोटी 96 लाख 50 हजार 721) या देशांचा क्रमांक लागतो.