युरो कपमध्ये स्वित्झर्लंडचा रोमहर्षक विजय
बुखारेस्ट ः वृत्तसंस्था
युरो कप स्पर्धेत स्वित्झर्लंड संघाने जग्गज्जेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-5च्या फरकाने धुव्वा उडवत मोठ्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही सामना 3-3च्या बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्येही अटीतटीचा सामना पहायला मिळाला. 1938नंतर पहिल्यांदाच स्वित्झर्लंडने बादफेरीच्या पुढे मजल मारलीय, तर कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्वित्झर्लंडने धडक मारण्याचा योग 67 वर्षांनंतर जुळून आला.
स्वित्झर्लंडच्या हॅरीस सेफेरोव्हिकने सामन्याच्या 15व्या आणि 81व्या मिनिटाला गोल केला, तर स्वित्झर्लंडसाठी तिसरा गोल सामन्याच्या 89व्या मिनिटाला मारियो गॅव्हरानोव्हिकने नोंदवला. दुसरीकडे फ्रान्ससाठी दुसर्या हाफच्या पहिल्या 15 मिनिटांमध्ये दोन गोल नोंदवले. हे दोन्ही गोल कारिम बेन्झीमाने 57व्या व 59व्या मिनिटाला नोंदवले, तर पॉल पोग्बाने 75व्या मिनिटाला गोल नोंदवत फ्रान्सची आघाडी 3-1वर नेली, मात्र त्यानंतर अवघ्या 14 मिनिटांमध्ये स्वित्झर्लंडने दोन गोल करीत सामना 3-3च्या बरोबरीत सोडवला.
पेनल्टी शूट आऊटमध्येही अटीतटीचा सामना पहायला मिळाला, मात्र फ्रान्सच्या माबपेचा अगदी शेवटचा शॉर्ट यान सोमेरने अडवला आणि सामना 5-4च्या फरकाने स्वित्झर्लंडने जिंकला. या पराभवामुळे पोर्तुगालपाठोपाठ फ्रान्सचा दादा संघही स्पर्धेबाहेर फेकला गेला. आता उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्पेनशी होणार आहे.