राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामध्ये विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना या संबंधी योग्य निर्णय घेण्यास सांगितले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने 23 जून रोजी राजभवन येथे भेट घेऊन दोन निवेदने सादर केली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवसांचा ठेवण्यात आला आहे. राज्यापुढे सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे सरकारने पळ न काढता अधिवेशनाच्या कालावधीत वाढ करावी, नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले विधानसभेचे अध्यक्षपद तातडीने भरण्यात यावे तसेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने सध्याच्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशा तीन मागण्या फडणवीस यांनी राज्यपालांकडे निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत.
शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध घटकांचे अनेक प्रश्न ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत फडणवीस यांच्या नेतत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या.
राज्यपालांनी या मागण्यांची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ’फडणवीसांनी मांडलेले तिन्ही विषय महत्त्वाचे आहेत. त्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती मला द्यावी,’ असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.