अलिबाग : प्रतिनिधी
महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणार्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद‘ च्या माध्यमातून 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात उमेद अभियानातून सामूहिक व वैयक्तिक स्वरुपात 412 परसबागांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये स्वयं सहाय्यता समूह तसेच ग्रामसंघांच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन परसबाग निर्मिती केली आहे. रायगड जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता समुहांच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने परसबाग तयार करून प्रत्येक कुटुंबाला विषमुक्त पालेभाज्या उपलब्ध करून देण्याचा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सदर परसबागेत वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, कारली, मिरची यासोबत पालक, मुळा, मेथी, माठ अशा विविध पालेभाज्यांची लागवड केली आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समुहांनी व ग्रामसंघांनी या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. माझी पोषण परसबाग विकसन मोहीम मोहीम राबवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा अभियान सहसंचालक रणधीर सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चव्हाण तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहभागातून 412 परसबाग यांची निर्मिती केली आहे. तसेच आणखी परसबाग निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर आहे.