लंडन ः वृत्तसंस्था
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेची किशोरवयीन टेनिसपटू कोको गॉफ यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त अलेक्झांडर झ्वेरेव्ह, अँजेलिक कर्बर आणि मॅडिसन कीज यांनीही पुढील फेरी गाठली, मात्र ब्रिटनच्या अनुभवी अँडी मरे हरला. महिला एकेरीत 20व्या मानांकित गॉफने कॅजा जुव्हानला 6-3, 6-3 अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. 25व्या मानांकित कर्बरने अॅलेक्झांड्रा सास्नोव्हिचला 2-6, 6-0, 6-1 असे पिछाडीवरून नमवले. अमेरिकेच्या 23व्या मानांकित किजने 13व्या मानांकित एलिस मर्टेन्सला 7-5, 6-3 असे पराभूत केले. फ्रेंच विजेत्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने अनास्तासिया सेव्हास्टोव्हाला 7-6 (7-1), 3-6, 7-5 असे हरवले. पुरुष एकेरीत आठ वेळा विम्बल्डन जिंकणार्या सहाव्या मानांकित फेडररने 29व्या मानांकित कॅमेरून नॉरीवर 6-4, 6-4, 5-7, 6-4 अशी चार सेटमध्ये मात केली. इटलीच्या सातव्या मानांकित मॅट्टेओ बॅरेट्टिनीने अल्जाझ बेदेनवर 6-4, 6-4, 6-4 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. बिगरमानांकित इल्या इव्हाशकाने जॉर्डन थॉम्पसनला 6-4, 6-3, 6-4 असे नेस्तनाबूत केले. कॅनडाच्या 10व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हने अनुभवी मरेवर 6-4, 6-2, 6-2ने वर्चस्व गाजवले. जर्मनीच्या झ्वेरेव्हने टेलर फ्रिट्र्झला 6-7 (3-7), 6-4, 6-3, 7-6 (7-4) असे संघर्षपूर्ण लढतीत नमवले. निक किर्गिओसने दुखापतीमुळे माघार घेतली.