पनवेल ः प्रतिनिधी
शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला कर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळा व गैरव्यवहारामुळे देशोधडीला लागलेली सामान्य माणसे तसेच आयुष्याच्या निवांत वेळी गुंतवणूक करून निर्धास्त झालेले निवृत्त ज्येष्ठ नागरिक यांनी दै. ‘राम प्रहर’शी बोलताना प्रचंड राग आणि तळतळाट व्यक्त केला आहे.जमा केलेली आयुष्यभराची पुंजी आपली कोणतीही चूक नसताना आपल्यालाच पुन्हा परत मिळत नसल्याने हतबल आणि अगतिक झालेल्या पनवेल, उरण आणि परिसरातील नागरिकांनी आपले म्हणणे पोटतिडकीने ‘राम प्रहर’च्या प्रतिनिधींकडे मांडले.
मी काशीनाथ भोईर, सध्या नवीन पनवेलमध्ये राहतो. सिमेन्स कंपनीत कामाला होतो. निवृत्त झाल्यावर मिळालेले सगळे पैसे मी कर्नाळा बँकेत ठेवले. वेगवेगळ्या 12 ठेवींमध्ये 50 लाख रुपये मी या बँकेत ठेवले होते. आमचे सहा जणांचे कुटुंब आहे. कोरोनामुळे सध्या घरात कोणी कमावणारे नाही. मला मधुमेह आणि ब्लड प्रेशर आहे. त्याची औषधे घेण्यासाठी आज माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. माझे घर पडले होते. त्याचे बांधकाम करण्यासाठी मला पैशांची गरज आहे, पण कर्नाळा बँकेतून अनेक दिवसांपासून पैसे मिळत नसल्याने अखेरीस मला नातेवाईक व मित्रांकडून कर्ज घ्यावे लागले. त्याचे व्याज भरावे लागत आहे. कोरोनामुळे उत्पन्नाचे साधन नसल्याने आता हे पैसे कसे परत करायचे याचे टेन्शन आल्याने माझे ब्लड प्रेशर आणि शुगर वाढत आहे.
मी यादव केशवराम मेश्राम, नवीन पनवेलमध्ये राहतो. माझे वय 74 आहे. मी पनवेलला आयटीआयमध्ये नोकरीला होतो. तेथून निवृत्त झाल्यावर मला मिळालेले पैसे कर्नाळा बँकेत ठेवले. मी हार्ट पेशंट असल्याने मला रोजचा औषधाचा खर्च किमान 500 ते 550 रुपये आहे. कर्नाळा बँक बंद झाल्याने माझी मोठी अडचण झाली आहे. कर्नाळा बँकेत घोटाळा झालेला असल्याने आता आपले पैसे मिळणार नाहीत हे समजल्यावर मला मोठा धक्का बसला. त्याचा माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला असून माझे वजनही कमी झाले आहे. आपला औषधांचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न माझ्यापुढे आहे.
प्रकाश विचारे हे नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संघटनेचेही कर्नाळा नागरी सहकारी बँकेत खाते आहे. सभासदांची फी व मिळालेल्या देणग्यांचे पैसे या खात्यात जमा केले जात होते. विचारे म्हणतात की, कर्नाळा नागरी सहकारी बँक ही आपल्या ओळखीच्या लोकांची आहे म्हणून आम्ही तेथे पैसे ठेवले, पण ओळखीचा चोर जिवानिशी मारतो, असे म्हणतात तशीच आज आमची अवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही हे पैसे वापरतो, पण आता आमच्या पैशांचा आम्हालाच वापर करता येत नाही. आमच्या बर्याच सभासदांनी व्याजाच्या मोहाला बळी पडून आपले पैसे राष्ट्रीयकृत बँकेतून काढून कर्नाळा नागरी सहकारी बँकेत ठेवले. या मोहाचा फायदा घेत या संचालक मंडळातील नतद्रष्ट मंडळींनी जास्त व्याजाचे आमिष दाखवून काही दिवस व्याज दिले. आता मुद्दलासकट सगळे पैसे खाल्ले. आता ही प्रवृत्ती सहकार क्षेत्रात वाढत आहे. त्यामुळे आता अधिक व्याजाच्या मोहाला बळी न पडता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.