नाशिक ः प्रतिनिधी
महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भाजपवर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर राज्यातील सत्ताधार्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. भाजप राजकीय हेतूने खडसेंना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 8) नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना हा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. नाशिक महापालिकेच्या ग्रीन बससेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते शहरात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीविषयीही त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थेट काही बोलणे टाळले, मात्र भाजपवरील सर्व आरोप खोडून काढले आहेत. खडसेंच्या चौकशीच्या प्रकरणात मी काय बोलणार? जे काही सांगायचे आहे ते ईडीकडून सांगितले जाईल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. पुरावे असतील म्हणूनच ईडी चौकशी करीत असेल. कायदा आपले काम करीत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सूडभावनेने काम करण्याची प्रथा नाही, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.