Breaking News

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

पत्नीलाही ईडीची नोटीस

जळगाव ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील जमीन घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जावयाला अटक करण्यात आल्यानंतर आता ईडीकडून खडसेंच्या पत्नीला समन्स बजावण्यात आले आहे. याआधी गुरुवारी स्वत: खडसे यांची चौकशी करण्यात आली होती. सलग नऊ तास ही चौकशी चालली.
‘ईडी’च्या आरोपानुसार 2016मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव 31 कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्द्यावर ‘ईडी’चा तपास सुरू केला. ईडीने याबाबत गिरीश यांच्याकडे मंगळवारी कसून चौकशी केली, मात्र ते चौकशीस सहकार्य करीत नसल्याचे सांगून ‘ईडी’ने त्यांना अटक केली.
पुण्यातील भोसरी जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूलमंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात ‘बेंचमार्क बिल्डकॉन‘ कंपनीकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वळते करण्यात आल्याने ते ईडीच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. खडसे यांच्याविरोधात ईडीने बोगस कंपन्यांमार्फत पत्नी व जावयाच्या बँक खात्यात पैसे दिल्याच्या मुद्द्यावर चौकशी सुरू केली आहे. कोलकत्ता नोंदणीकृत अब्जयोनी, केमेक्स गुड्स, पर्ल डिलर्स, प्रोफिशियंट मर्कटाईज कंपन्यांमार्फत 20 ते 26 एप्रिल 2016 दरम्यान बेंचमार्क बिल्डकॉनच्या बँक खात्यात मोठ्या रकमा जमा झाल्या आणि प्रत्येकी दोन कोटी रुपयांची रक्कम जावई व पत्नीच्या बँक खात्यात वळती करण्यात आली. त्यातून जमीनमालकांना तीन कोटी 75 लाख रुपये देण्यात आले, तर एक कोटी 78 लाख रुपये मुद्रांक व नोंदणी शुल्क भरण्यात आली. या खरेदीशी आपला काही संबंध नाही, असा खडसे यांचा दावा असला तरी त्यांच्या बँक खात्यातून पत्नीच्या नावे 50 लाख रुपये पाठविण्यात आले आणि नोंदणी शुल्क भरले गेल्याचे तारखांच्या नोंदीवरुन दिसून येत असल्याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
भोसरीतील ही जमीन अब्बास उकानी यांच्या मालकीची होती ती एमआयडीसीने संपादित करूनही त्याची भरपाई मात्र देण्यात आली नव्हती. खडसे यांनी महसूल मंत्रिपदाच्या काळात या जमीन खरेदीची सूत्रे हालविली. महसूल, एमआयडीसीच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यामुळे मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि हेमंत गावंडे यांनी न्यायालयात आणि एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply