लखनऊ, कोलकाता ः वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये घातपाताचा मोठा कट उधळला असून एकूण पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. लखनऊत रविवारी (दि. 11) दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करीत अल-कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रेशर कुकर बॉम्बसह अन्य स्फोटके व विदेशी पिस्तुले जप्त करण्यात आली. या प्रकारानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) शनिवारी रात्री जमात-उल-मुजाहिदीनच्या दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल, डायरी व अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यूपी एटीएसने रविवारी लखनऊच्या काकोरी पोलीस ठाणे परिसरात छापेमारी केली. एटीएसने छापा टाकला त्या घरात सात लोक राहत होते. त्यातील पाच जण पळाले, तर शाहिद खान उर्फ गुड्डू व वसीम शाहिद यांना अटक करण्यात आली. शाहिद पाच वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. तो टेलिग्रामद्वारे अल-कायदा व पाकिस्तानी हस्तक अल-उल यांच्याशी बोलत होता. दुसरी कारवाई कोलकाता एसटीएफने दक्षिण कोलकात्यातील हरिदेवपूरमधील एका घरात केली. तिथे तीन संशयित दहशतवादी घातपाताचा कट रचत होते. नाजी-उर-रहेमान, शेख शब्बीर व रिजाऊल अशी त्यांची नावे आहेत. दहशतवादी संघटनांचा विस्तार करण्यासाठीही त्यांच्या हालचाली सुरू होत्या.