मुंबई ः प्रतिनिधी
बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापार्यांनी 25 टक्के दुकाने बंद ठेवली आहेत, तर वीकेण्डला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी अशी स्थिती आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असूनही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्यांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मुंबईतील दुकानदार संघटनेने दिला आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या खाली आली आहे. तरीही मुंबईला तिसर्या श्रेणीत ठेवले आहे. त्यामुळे दुकानांवर विनाकारण निर्बंध लादले गेलेत. अशा स्थितीत मुंबईतील रोजची रुग्णसंख्या दोनशेच्या खाली येण्याचा अट्टाहास सोडून दुकानांवरील निर्बंध उठवावेत, असेही फेडरेशनचे म्हणणे आहे. मुंबईला पहिल्या-दुसर्या श्रेणीत आणल्यास बहुसंख्य दुकाने सुरू होतील व शहरवासीयांना दिलासा मिळेल. अत्यावश्यक दुकाने दिवसभर सुरू असल्याने गर्दी नसते, पण बिगर अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच खुली असल्याने संध्याकाळनंतर शॉपिंगला जाणारे नागरिक तेथे जातच नाहीत. वीकेण्डला ग्राहक येऊ शकतात, पण तेव्हा बिगर अत्यावश्यक दुकाने बंदच असतात. खर्च परवडत नसल्याने अनेकांनी दुकाने बंदच ठेवलीत. कोरोनाच्या नावाखाली मुंबईला निर्बंधात जखडू नये, अन्यथा नाराज व्यापारी तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे उर्वरित देशांप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रातील निर्बंध उठवावेत, असे आवाहनही फेडरेशनने केले आहे.