Monday , February 6 2023

आता कराडे बुद्रूकमधील कार्यक्रमात उद्घाटक म्हणून विवेक पाटलांचे नाव

  • शेकापवाल्यांचे डोके ठिकाणावर आहे का?
  • कर्नाळा बँकेच्या ठेवीदार, खातेदारांचा संतप्त सवाल

पनवेल ः रामप्रहर वृत्त
500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेले बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करीत त्यांना जेलमध्ये टाकलेले आहे. त्यांची 12 जुलैपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. असे असताना 7 जुलै रोजी पाले खुर्द येथे रायगड जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात विवेक पाटील यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती चक्क कोनशिला फलकावर दर्शवून शेकाप नगरसेविकेने अकलेचे तारे तोडले होते. असाच प्रकार रसायनी पाताळगंगा परिसरातील कराडे बुद्रूक येथे घडल्याचे समोर आल्याने शेकापवाल्यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा संतप्त सवाल कर्नाळा बँकेच्या ठेवीदार, खातेदारांनी केला आहे.
 कराडे बुद्रुक येथे पुरातन शिवमंदिराजवळ घाट तयार करण्यात आला असून या कामाचे उद्घाटन 2 जुलै रोजी झाले, मात्र आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँक घोटाळ्याचे सूत्रधार शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचे नाव या ठिकाणी कोनशिलेवर उद्घाटक कोरण्यात आले आहे. त्यामुळे पाले खुर्दप्रमाणे येथेही विवेक पाटलांची उपस्थिती कशी काय, असा प्रश्न पुन्हा नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, ईडीच्या कारवाईमुळे विवेक पाटील जेलमध्ये आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. ते शेकापच्या स्थानिक पुढार्‍यांना आणि कार्यकर्त्यांनाही माहिती असणारच, मात्र विवेक पाटलांचे नाव या फलकावर मुद्दामहून लावून त्यांना डिवचण्याचे काम शेकापच्या एका गटातून केले जात असल्याची चर्चा आता पनवेलसह रायगडमध्ये रंगू लागली आहे. जर विवेक पाटील यांच्यावर खरंच प्रेम असते तर ते जेलमध्ये असताना त्यांचे नाव फलकावर कोरून त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला, असा उल्लेख केला गेला नसता. त्यामुळे हा मुद्दामहून घातलेला घाट होता हे स्पष्ट झाले असून अडचणीत सापडलेल्या विवेक पाटलांवर आसूड ओढण्याचे काम त्यांच्याच पक्षातील विरोधी गटातून होत असल्याचे समोर आले आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply