Breaking News

इटली अजिंक्य!

इंग्लंडला नमवत युरो चषक जिंकला

लंडन ः वृत्तसंस्था
इटलीने इंग्लंडवर मात करून युरो कप 2020च्या विजेतेपदाचा मान पटकावला. वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये इटलीने 3-2ने बाजी मारली.
स्पर्धेतील सर्वांत जलद गोल करीत दणदणीत सुरुवात करणार्‍या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक, तर दुसर्‍या सत्रात इटलीने गोल करीत बरोबरी साधली होती. 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल समोर आला नव्हता. पेनल्टी शूटआऊटमध्ये जेडन सँचो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले. याचबरोबर तब्बल 55 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लंडचे स्वप्न हे धूळीस मिळाले आहे.
सामन्यात पहिल्या सत्रापासून इंग्लंडची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या दुसर्‍या मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉने गोल झळकावत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे इटलीच्या संघावर दडपड होते. मात्र दुसर्‍या सत्रात इटलीने जोरदार कमबॅक केले. 67व्या मिनिटाला इटलीचा खेळाडू लिओनार्डो बोनच्चीने गोल करीत इंग्लंडशी बरोबरी केली. त्यामुळे संघावरील दडपण दूर झाले, मात्र दोन्ही संघांना 90 मिनिटांच्या खेळात विजयी गोल झळकावता आला नाही. त्यामुळे 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला, मात्र तिथेही दोन्ही संघ विजय करण्यास अपयशी ठरले. अखेर सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आणि इटलीने सामना जिंकला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीच्या डॉमेनिको बेरार्डीने पहिला गोल केला, तर इंग्लंडच्या हॅरी केनने गोल झळकावत बरोबरी साधली. त्यानंतर इटलीच्या अँड्रिया बेलोट्टीचा गोल मिस झाला आणि इटलीवर दडपण वाढले. पुढे इंग्लंडच्या हॅरी मग्युरेने गोल झळकावत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर इटलीच्या लेओनार्डोने गोल करीत 2-2 बरोबरी केली, मात्र दुसरा गोल हुकल्याने इटलीवरील दडपण कायम होते. दरम्यान, इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्डचाही गोल हुकला आणि इटलीच्या जीवात जीव आला.
फेडेरिकोने गोल करीत इटलीला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आलेला जॅडॉन सँचोही इंग्लडला बरोबरी साधून देण्यास अपयशी ठरला. इटलीच्या जॉर्जिओने विजयी गोल करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे पाच गोलचा पेनल्टी शूट बरोबरी सुटेल अशी आशा होती, मात्र इंग्लंडचे खेळाडू सलग तीन गोल करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडच्या बुकायो साकाही गोल करण्यात अपयशी ठरला आणि इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना 3-2ने जिंकला. विशेष म्हणजे या स्पर्धेत इटलीने एकही सामना गमावला नाही.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply