Breaking News

लसीकरणाचा वेग कायम राखा

पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठकीत राज्यांना सूचना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
 देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 6) उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना संसर्गाचा राज्य आणि जिल्हानिहाय आढावा घेतला. या वेळी पंतप्रधानांनी औषधांची टंचाई आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाचा वेग कायम राखावा, अशी सूचना मोदींनी या वेळी केली.
राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन, हर्षवर्धन, पीयूष गोयल, मनसुख मांडविय यांच्यासह इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी पायाभूत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले. लसीकरणाचा वेग कायम ठेवण्यासाठी राज्यांनी संवेदनशील होऊन काम करण्यावर पंतप्रधान मोदींनी या वेळी भर दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या एक लाखांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या 12 राज्यांमधील स्थितीबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनाच्या राज्य आणि जिल्हानिहाय स्थितीचीही सविस्तर माहिती तसेच सर्वाधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांचीही माहिती देण्यात आली. राज्यांकडून पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये वेगाने करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली गेली. आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन केले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 पंतप्रधान मोदींनी या वेळी औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. त्यांना रेमडेसिवीरसह इतर आवश्यक औषधांचे उत्पादन वाढवण्यासंबंधी प्रयत्नांची माहिती दिली गेली. लसीकरण मोहिमेचा आढावा घेत पंतप्रधान मोदींनी पुढील काही माहिन्यांमध्ये लसींचे उत्पादन वाढवण्याचा आढावा घेतला. केंद्राकडून राज्यांना आतापर्यंत 17.7 कोटी लसीच्या डोसचा पुरवठा करण्यात आला. लसीचे डोस वाया जाण्याच्या मुद्द्यावरही मोदींनी आढावा घेतला. 45 वर्षांवरील 31 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply