Breaking News

उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय? की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय?

राज ठाकरेंचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 6) पत्रकार परिषद घेऊन राज्यात मागील काही काळापासून घडत असणार्‍या घडामोडींवर भाष्य केले. मला काल कोणीतरी एक चांगला विनोद पाठवला. ’उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय?’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी विनोदाचा संदर्भ देत आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून सर्व उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
राज्यात मंत्र्यांनी जी कृत्ये केली, त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यापुढे आणखी मंत्र्यांनी असे काही कृत्य केले तर त्यांचाही राजीनामा होईल. सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील तर त्यांच्या मंत्र्यांनीही असे काही काम केलेय म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
अनिल देशमुख यांचा राजीनामा हा महत्त्वाचा विषय नाही. महत्त्वाचा विषय मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी जी बॉम्बची गाडी ठेवली ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली? कोणीतरी आदेश दिल्याशिवाय पोलीस हे कृत्य करणार नाही? जिलेटिन असलेली गाडी ठेवली कोणी याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या वेळी राज यांनी केली.
शाळा बंद, शिक्षण ऑनलाइन, पण फी कायम, असे का, असा सवाल करून शाळांची फी निम्मी करा. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केले पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना राज्य सरकारने हमीभाव द्यायला हवा, अशा मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन चर्चेत केल्या असल्याची माहितीही राज यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply