नागोठण्यात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
नागोठणे : प्रतिनिधी
सन 1995पासून मी निवडणूक लढवत असून, नागोठणे विभागाने मला कायमच सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत पेण मतदारसंघातून मला उमेदवारी दिली असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी येथे केले. भाजपचे नेते, माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे प्रचार कार्यालय नागोठण्यातील मोदी पार्कमध्ये उघडण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद लाड यांनी केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, सतीश धारप, रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, विनोद अंबाडे यांनीही महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन केले. पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, संदीप म्हात्रे, आनंद लाड, सचिन मोदी यांच्यासह नागोठणे विभागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
कर्जतमध्ये महेंद्र थोरवे यांची जुळवाजुळव
कर्जत : बातमीदार
महायुतीचे उमेदवार म्हणून कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने महेंद्र थोरवे यांना संधी दिली आहे. उमेदवारी नक्की झाल्यानंतर प्रचाराचे नियोजन करण्यासाठी थोरवे यांनी शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या (आठवले गट)प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. शुक्रवारी (दि. 4) थोरवे महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार असून, त्याआधी शिवसेनेमधील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महेंद्र थोरवे यांनी कर्जतजवळ पोसरी येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता बैठकीला भाजप आणि आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते, मात्र शिवसेनेचे काही पदाधिकारी उपस्थित नव्हते. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आरपीआय आठवले गटाचे कर्जत तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनीदेखील महायुतीचे उमेदवार थोरवे यांच्या विजयासाठी सेनेच्या एक पाऊल पुढे भाजप आणि आरपीआय असेल, असे आश्वासित केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांनी प्रास्ताविक केले, तर विधानसभा मतदारसंघ संघटक संतोष भोईर यांनी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण उमेदवार आहे असे समजून काम करण्याचे आवाहन केले. या वेळी थोरवे म्हणाले की, आजच्या बैठकीला काही पदाधिकारी नाहीत, परंतु मी त्यांची भेट घेत आहे. शिवसैनिकांच्या जोडीला भाजप आणि आरपीआयची ताकद आहे. सर्वांनी एकजुटीने प्रचार केल्यास विजय दूर नाही. त्यासाठी मतभेद विसरून भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीनंतर महेंद्र थोरवे यांनी यापूर्वी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, खोपोली शहरप्रमुख सुनील पाटील यांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, 2014मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे हनुमंत पिंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, तर आणखी एक इच्छुक रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांची भूमिका अद्याप समजू शकली नाही. त्यामुळे बंडखोरी होऊ नये याची दक्षता थोरवे आणि शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. तशी पावले उचलली जात असल्याचे सध्या दिसत आहे.
रविशेठ पाटील आज अर्ज भरणार
पेण : प्रतिनिधी
पेण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्यांकडे दाखल करणार आहेत. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.