मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुरूड-अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील जुना छोटा दगडी पूल रविवारी (दि. 11) कोसळला. त्या वेळी पुलावरून एक चारचाकी आणि दोन दुचाकी जात होत्या. ती वाहने पुलासह खाली कोसळली, मात्र वेळीच मदत मिळाल्याने चारचाकीमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले, तर एक दुचाकीस्वार वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, या मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली असून, सर्व गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुरूड-अलिबाग रस्त्यावर काशीद येथे नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी जुना दगडी पूल आहे. संततधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि रात्रीच्या सुमारास हा पूल कोसळला. या वेळी पुलावरून एक चारचाकी वाहन व दोन दुचाकी जात होत्या. ही सर्व वाहने पुलासह खाली कोसळली. त्यापैकी चारचाकी गाडीमधील सर्वांना वाचविण्यात यश आले, मात्र विजय चव्हाण (रा. एकदरा) हा दुचाकीस्वार पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली. हा पूल काही दिवसांपूर्वी खचल्याचे लक्षात आल्यानंतर काशीद ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याबाबत तक्रार केली होती, तसेच ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार करूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या खात्याच्या अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काशीद ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे यांनी केली आहे. दरम्यान, काशीद येथील जुना दगडी पूल कोसळल्यामुळे मुरूड-अलिबाग या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, ती सुपेगावमार्गे साळाव पूल, रेवदंडा अशी वळविण्यात आल्याची माहिती आहे.