Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या आमदारांनी फिरवली पाठ

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 22) ऑनलाइन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या दोघांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे या तीनही आमदारांनी पाठ फिरवली. या कार्यक्रमाकडे शिवसेनेचा कोणताही स्थानिक नेतादेखील फिरकला नाही.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन विद्यमान आमदार आहेत. काही दिवसांपासून शिवसेनेने पालकमंत्री हटाव भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष सुरू आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर येथे रायगड जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातील सर्वच आमदार यांची नावे होती, मात्र आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे या तिघांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या तीन आमदारांनी कार्यक्रमास गैरहजर राहून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावरील आपली नाराजी पुन्हा व्यक्त केली. शिवसेनेचे पदाधिकारीदेखील या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. शिवसेनाचा फलक व एकही झेंडा या कार्यक्रमाच्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमावर शिवसेनेच्या आमदारांनी टाकलेला बहिष्कार हा चर्चेचा विषय ठरला आहे.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतेदेखील नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, सर्वांना सोबत घेऊन काम करा, असा सल्ला पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांना या वेळी दिला.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाइन उपस्थित होते, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषेदच्या अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुरेश लाड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता महेंद्र कुरा, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरात, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, अ‍ॅड.  प्रवीण ठाकूर, राजा ठाकूर, खानावच्या सरपंच अनिता गोंधळी, आरसीएफचे श्रीनिवास कुलकर्णी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply