म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोविड-19चे रुग्ण वाढत आहेत, मात्र ग्रामीण रुग्णालयात स्थापनेपासून वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांचा कारभार श्रीवर्धनमधून केला जात आहे, तर तालुका आरोग्य अधिकार्याचा कारभार जि. प. दवाखाना पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी पहातात. तालुक्यातीत नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी ही दोन्ही पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. तालुक्यात आरोग्य यंत्रणेतून एक ग्रामीण रुग्णालय व म्हसळा, मेंदडी व खामगाव असे तीन जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, पाभरे येथील एक जि. प. दवाखाना यांच्या माध्यमांतून रुग्णांना सेवा दिल्या जात आहेत. तालुका आरोग्य आधिकार्यांमार्फत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प. दवाखाना, तालुक्यातील उपकेंद्र यामार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम, पल्स पोलिओ, आरोग्य सेविकांना प्रशिक्षण देणे, दुर्धर आजार, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम याविषयी कामकाज व अन्यबाबत कार्यवाही केली जाते. तालुका आरोग्य व्यवस्थेत तालुका आरोग्य अधिकारी म्हसळा, मेंदडी ,खामगाव म्हसळा असे तीन प्राथमिक केंद्र, पाभरे येथील एक जि. प. दवाखाना यांच्या माध्यमांतून रुग्णांना सेवा दिल्या जातात, पण वैद्यकीय अधिकारी पदे सोडून सेवा देणारी कनिष्ठ सहायक, आरोग्य सहाय्यक (पु), आरोग्य सहाय्यक (म), आरोग्य सेवक (पु), आरोग्य सेवक (म), औषध निर्माता (मिश्रक), शिपाई, स्त्री परिचर, कुष्ठरोग तंत्रज्ञ अशी तब्बल 31 पदे रिक्त आहेत. तालुक्यातील तीनही प्राथमिक केंद्रातील ऑपरेशन थिएटर अद्ययावत व दुरुस्ती करणे आवश्यक आहे, बेड, गाद्या-उशा, रुग्ण तपासणी टेबल, ख. त. स्टँड, ड्रेसींग ट्रॉली, स्टरलायझेशन मशीन नव्याने पुरविणे आवश्यक आहे.