Tuesday , February 7 2023

पुरामुळे नांदगाव हायस्कूलचे नुकसान

मुरुड : प्रतिनिधी
तालुक्यातील यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या कार्यालयासह प्रत्येक वर्गात पुराचे पाणी शिरल्यामुळे शाळेतील  वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुरूड तालुक्यात सोमवारी 348 मिलीमीटर त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी 204 मिलीमीटर पाऊस पडल्याने नदी व समुद्राशेजारी असणार्‍या सर्व गावांत पुराचे पाणी शिरले. नांदगाव हायस्कूलमध्ये तर प्रत्येक वर्गात व कार्यालयात चार फूट पाणी होते. खुर्च्या, टेबल्स, पुस्तके, संगणक पाण्यात तरंगत होते. या हायस्कूलमधील चार सीपीयु, एक प्रिंटर, दोन प्रोजेक्टर, शाळेचा जनरेटर, कॅन्टीनमधील फ्रिज, मिक्सर व ओव्हन, लॉउडस्पीकर, विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक, ग्रंथालयातील पुस्तके, विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणारी पाठ्यपुस्तके, सॅनिटायझर मशीन, विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका, शाळेचे जनरल रजिस्टर, शिक्षकांची सेवा पुस्तके आदी पाण्यात भिजल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात या हायस्कूलच्या छपरावरील सर्व पत्रे व कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यातून  शाळा सावरत असताना आता पुराच्या पाण्यामुळे  शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, तलाठी मयेकर मॅडम यांनी पुरामुळे झालेल्या शाळेच्या नुकसानीचा रीतसर पंचनामा केला. यावेळी या शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन फैरोज घलटे, संचालक अस्लम हलडे, मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply