पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याप्रमाणेच पनवेल कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4000 आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला असून पनवेल कार्यक्षेत्राचा पॉझिटिव्हीटी दर कमी होऊन हा दर 2.5 झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत. यामुळे अनेकवेळा काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही अजून संपलेली नाही, असे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. मागील महिन्यात पॉझिटिव्ह येणार्या नागरिकांची संख्या कमी झाली होती, मात्र गेल्या काही दिवसापासून या संख्येत कमी-अधिक प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. डेल्टा प्लस उत्परिर्वतीत विषाणूचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानूसार गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या पनवेल कार्यक्षेत्रात केल्या जात आहेत. प्रभाग अधिकारी आणि पोलिस विभागाशी समन्वय साधून सर्व डॉ. प्रियांका माळी यांच्या नियोजनाप्रमाणे विविध नोडमधील संबधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरर्स त्यांच्या टिम सहीत सर्वत्र जाऊन आरटीपीसीआर व अँटीजेन चाचण्या करीत आहेत.
दिनांक केलेल्या चाचण्या
9 जुलै 5 हजार 919
10 जुलै 6 हजार 193
11 जुलै 3 हजार 285
12 जुलै 3 हजार 702
13 जुलै 3 हजार 862
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार चाचण्या
उपायुक्त सचिन पवार आणि मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या चाचण्या पनवेल कार्यक्षेत्रातील पनवेल, न्यू पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा या नोडमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करण्यात येत आहे. या नोडमधील गर्दीची ठिकाणे, बाजार, रेल्वे स्थानके, बस स्थानके, कंटेन्मेंट झोन, शासकीय आस्थापना, दुकाने अशा सर्व ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.