कोंबड्या, मोर आणि कावळे दगावले; गावांत अलर्ट जाहीर
बीड, यवतमाळ : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात व यवतमाळ जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. आंबेजोगाईच्या येथील लोखंडी गावात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू मुळेचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथील 10 गावांत अलर्ट जाहीर करण्यात आला असून कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कोंबड्या, मोर आणि कावळे बर्ड फ्लूमुळे मृत झाल्याचे आढळले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे कोंबड्यांचा झालेला मृत्यू बर्ड फ्लू रोगानंच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोखंडी सावरगाव येथील बाधित कोंबड्यांचे वैज्ञानिक पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोखंडी सावरगाव शिवारातील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांचं वैज्ञानिक पद्धतीने कलिंग करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
तर अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ, सनगाव, डिघोळ आंबासह लोखंडी सावरगाव परिसरातील 10 गावांमध्ये सावधगिरीचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 10 गावांमध्ये कोंबड्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आर्णी तालुक्यातील खंडाळा जंगलात गेल्या आठवड्यात आठ मोर आणि कावळे मृत आढळले होते. या पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. या मोरांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे उघड झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील लिंगटी येथे जवळपास 500 कोंबड्या तर खैरी येथेदेखील दिडशेवर कोंबड्या दगावल्या असल्याने त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे, दरम्यान जिल्हा प्रशासनाने या गावात अलर्ट झोन जाहीर केला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.