अनेक गावांत पाणी घुसले
अलिबाग ः प्रतिनिधी
मुसळधार पावसाने रविवारी (दि. 18) रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. उत्तर रायगडमध्ये तर पावसाने धुमाकूळ घातला. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागासह सारळ, म्हात्रोळी, रेवस, मिळखतखार, कार्ले आदी गावांमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी 118.29 मिमी पाऊस पडला. रोहा तालुक्यात सर्वाधिक 184 मिलिमीटर, तर त्या खालोखाल पनवेलमध्ये 182 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शनिवारी 10 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला होता. हळूहळू जोर अधिकच वाढत गेला. रात्रीची वेळ असल्याने एकीकडे अंधार, तर दुसरीकडे तुफान पाऊस आणि त्यातच काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पावसाची भयानकता अधिकच जाणवत होती. या पावसामुळे ग्रामस्थांची झोप उडाली. अलिबाग तालुक्यातील सारळ ते म्हात्रोळी गावचा रस्ता रात्रीच्या पावसात पाण्याखाली गेला होता.
रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत रायगड जिल्ह्यात एक हजार 892 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रोहा तालुक्यात सर्वाधिक 184 मिलिमीटर, तर त्याखालोखाल पनवेलमध्ये 182 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 118.29 मिमी इतका पाऊस पडला. रविवारीदेखील पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या.
तालुकानिहाय पाऊस (मिमी)
रोहा 184, पनवेल 182, पेण 168, उरण 155, अलिबाग 147, माथेरान 138.40 मुरूड 136, सुधागड 120, खालापूर व म्हसळा प्रत्येकी 113, श्रीवर्धन 89, तळा 85, कर्जत 74.40, पोलादपूर 69, महाड 68, माणगाव 51, एकूण 1 हजार 892.60, सरासरी 118.29, टक्केवारी 53.58.