एका बाजूला चुपके चुपके दुसर्‍या बाजूला राजा जानी

धर्मेंद्र हा कधीच न संपणारा विषय. साठच्या दशकातील कृष्ण धवल अर्थात ब्लँक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटातील धर्मेंद्र (दिल भी तेरा हम भी तेरे, बंदीनी, देवर, खामोशी, अनपढ, हकिकत वगैरे)
सत्तरच्या दशकातील मारधाड, ऍक्शन हिरो (यादो की बारात, बदले की आग, राम बलराम इत्यादी)
प्रणय, विनोद, मारधाड, डायलॉगबाजी (शोले, प्रतिज्ञा, द बर्निग ट्रेन, शालिमार इत्यादी)
आदर्शवादी भूमिका (सत्यकाम नया जमाना दोस्त इत्यादी चित्रपट) धर्मेंद्रबाबत सांगायचे तर एक माहितीपट तयार होईल. तो ही मेन वा आपल्या पिळदार शरीरयष्टीचे पडदाभर (फूल और पत्थर, साजीश, पाकिटमार इत्यादी चित्रपट) दर्शन घडवणारा रांगडा नायक असेच फक्त आणि फक्त नाही.
त्याच्या तीनशेहून जास्त चित्रपटातील नेमके दोन चित्रपट निवडून त्याचे अष्टपैलूत्व अधोरेखित करणे महाकठीण.
एका बाजूला त्याचा नर्मविनोदी चित्रपट चुपके चुपके आणि दुसरीकडे त्याचा मारधाड ऍक्शन हिरो राजा जानी या दोन चित्रपटांवर फोकस टाकताना भिन्न प्रकारच्या चित्रपटातून धर्मेंद्र प्रभावी ठरल्याचे दिसून येते.
चुपके चुपके बघा,
बेगम इश्क का मजा ही चुपके चुपके से करने मे है
पती के गुण धीरे धीरे पता चलना चाहिए, उसे प्यार धीरे धीरे बढता है…
ऍक्टर क्या है… डायरेक्टर के हाथ की कठपुतली…
जितना बडा जिस्म है, उतना बडा दिल भी दिया है…
क्लायमॅक्स मे पहुंच कर ड्रामा की छुट्टी मत कराव…
गुलजार यांच्या खुसखुशीत, चुरचुरीत, मार्मिक, मिश्किल संवादाने अनेक प्रसंग खुलत, रंगत रंगत ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चुपके चुपके (मुंबईत प्रदर्शित 11 एप्रिल 1975) निखळ मनोरंजन करतो, आजही त्यातील प्रसंग आठवले तरी पटकन चेहर्यावर हास्य उमटते.(त्याचीच आजच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय वातावरणात गरज आहे) एक स्वच्छ मनोरंजन चित्रपट हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य. धर्मेंद्रचा हा चित्रपट खास उल्लेखनीय ठरतो.अशा कलाकृती कधीच कालबाह्य होत नाहीत. ही मोठीच मिळकत. ओटीटीवर पाहून एन्जॉय करता येईल.
चुपके चुपके. कधीही कोणत्याही दृश्यापासून पहावा, तीच खुमारी. तीच रंगत. असे हलके फुलके मनोरंजन देणारे चित्रपट म्हणजे जणू जवळचे खास मित्रच. पुन्हा पुन्हा असे चित्रपट पहावेत व फ्रेश व्हावे. पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात या चित्रपटाने शंभर दिवसांचे यश संपादन केले.
उपेंद्रनाथ गांगुली यांच्या उहहरवेलशीहळ या बंगाली साहित्यवार आधारित छदूमवेश या बंगाली चित्रपटाची रिमेक म्हणजे चुपके चुपके. गुलजार यांचे लेखन व ह्रषिकेश मुखर्जी यांचे दिग्दर्शन ही गोष्टच चित्रपटाचा क्लास स्पष्ट करते. चित्रपटाची निर्मिती ह्रषिकेश मुखर्जी व एन. सी. सिप्पी यांची आहे. त्यांनीच आनंद वगैरे अनेक चित्रपट निर्माण केले. चुपके चुपकेचे छायाचित्रणकार जयवंत पाठारे आहेत. ह्रषिकेश मुखर्जी व जयवंत पाठारे हीदेखील एक दिग्दर्शक व छायाचित्रणकार अशी जमलेली जोडी. त्या काळातील चित्रपटांचे हेदेखील वैशिष्ट्य. (जयवंत पाठारे आमच्या गिरगावातील निकतवरी लेनचे रहिवाशी याचा आम्हाला केवढा अभिमान.) चुपके चुपके च्या चित्रीकरणाचा खास किस्सा आहे. याचे बरेचसे चित्रीकरण निर्माते एन. सी. सिप्पी यांच्या जुहू येथील बंगल्यात झाले यातही एक विशेष उल्लेखनीय गोष्ट आहेच. याच बंगल्यात आनंद, नमक हराम, चुपके चुपके, सत्ते पे सत्ता या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याचा अमिताभ बच्चन यानी गतवर्षी ब्लॉग लिहिला. तोच बंगला अमिताभ बच्चननी खरेदी केल्यावर त्याचे नाव मनसा असे ठेवले होते. काही महिन्यांनी ते नाव बदलून जलसा असे ठेवले. आणि आता मुंबईत असल्यावर प्रत्येक रविवारी अमिताभ याच बंगल्याबाहेर येत आपल्यावर निस्सीम प्रेम करणार्‍यांना आवर्जून दर्शन देतात. (याच बंगल्यात इन्कार इत्यादीचे चित्रीकरण झाल्याचेही दिग्दर्शक राज एन. सिप्पी यांनी एका भेटीत मला सांगितले.)
चुपके चुपके तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असणार. त्यामुळेच प्रोफेसर परिमल त्रिपाठी अर्थात प्यारे मोहन अलाहाबादी
(धर्मेंद्र) आणि प्रोफेसर सुकुमार सिन्हा (अमिताभ बच्चन) यांची मजेशीर जुगलबंदी तुम्ही मनसोक्त मनमुराद अनुभवली आहेच. त्यात त्यांच्या पत्नी शर्मिला टागोर
(धर्मेंद्रची) व जया बच्चन (अमिताभ) यांची साथ आहेच. याशिवाय ओम प्रकाश, उषा किरण, लीली चक्रवर्ती, असरानी (ह्रषिदांच्या चित्रपटातील तो जणू हुकमी), डेव्हिड, विशाल देसाई, नयना आपटे असे अनेक कलाकार याच रंजकतेत भर घालतात.
ह्रषिदांच्या चित्रपटातील गीत संगीत कायमच उल्लेखनीय. यात आनंद बक्षी यांच्या गीतांना सचिन देव बर्मन यांचे संगीत. चुपके चुपके चल रे (पार्श्वगायिका लता मंगेशकर), सारेगामा
(मोहम्मद रफी व किशोरकुमार), बागों मे ये कैसे फूल खिलते है (लता मंगेशकर व मुकेश), अब के सजन (लता मंगेशकर) या गाण्यांचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण डोळ्यासमोर येतेच. येथेही दिग्दर्शक दिसतो.
चुपके चुपके या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होताना त्यात विनोद मेहरा, रेखा, रितेशकुमार, मौशमी चटर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत असे वृत्त होते. रितेशकुमार म्हणजे संगीतकार व पार्श्वगायक हेमंतकुमार यांचा मुलगा व मौशमी चटर्जीचा पती. पण ही केवळ बातमीच राहिली. धर्मेंद्र, शर्मिला टागोर, अमिताभ, जया यांनी ह्रषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातून भूमिका साकारण्याचा तोपर्यंत अनुभव घेतला होता. विशेषत: जया बच्चनवर त्यांचा जास्त विश्वास हे सर्वज्ञात. खरं तर, चुपके चुपके पडद्यावर येईपर्यंत धर्मेंद्र ही मॅन (मै तेरा खून पी जाऊंगा) आणि अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन (कौन है वो माय का लाल) अशी इमेज झालेली. त्यांनी प्रासंगिक विनोद व शब्द चातुर्याची गंमत असे रसिकांसमोर आणणे व ते स्वीकारले जाणे हे विशेष उल्लेखनीय.
ह्रषिदांनी आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीत केवढी तरी विविधता दाखवली आहे. आणि त्यात एक विशेष गोष्ट, हलके फुलके मनोरंजन. त्यांच्या दिग्दर्शनातील बावर्ची, सबसे बडा सुख, चुपके चुपके, गोलमाल, खुबसुरत, नरम गरम, रंग बिरंगी, झूठ बोले कौवा कांटे हे चित्रपट त्या वळणाचे. अंधेरी कुर्ला रोडवरील मोहन स्टुडिओ ह्रषिदांचा अगदी खास.
…सत्तरच्या दशकातील आणखीन एक विशेष,
त्या दशकातील ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी अशा दिग्दर्शकांचे अनेक चित्रपट तसेच बी. आर. चोप्रा दिग्दर्शित पती पत्नी और वो, रजत रक्षित दिग्दर्शित दामाद अशा अनेक स्वच्छ मनोरंजक चित्रपटांमुळे सर्वांसाठी (युनिव्हर्सल म्हणजे यू) व फक्त प्रौढांसाठी
(अ‍ॅडल्स म्हणजे ए) याबरोबरच दर्जेदार (क्वालिटी म्हणजे क्यू) असेही प्रमाणपत्र देण्यात यावे अशीही बरीच चर्चा झाली. पण ती केवळ चर्चाच राहिली. म्हणून काय चित्रपटाचे महत्व कमी होत नाही.
चुपके चुपके मधीलच एक संवाद सांगायचा तर,
जो है वो नही है…और जो नहीं है वो, वो कैसे हो सकता है.
ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित काठी या चित्रपटाचा मुहूर्त आठवतोय. मोहन स्टूडिओत धर्मेंद्रवर मुहूर्त दृश्य चित्रित करण्यात आले होते. चित्रपटात गोविंदा व माधवी यांच्याही भूमिका होत्या. पण चार रिळाच्या चित्रीकरणानतर हा चित्रपट काही कारणास्तव बंद झाला. धर्मेंद्रचा एक सुपर हिट मसालेदार मनोरंजक चित्रपट राजा जानी कितना मजा आ रहा है…
रत्ना (हेमा मालिनी) रुपेरी पडद्यावर मनसोक्त गातेय आणि तेदेखिल खलपुरुष प्रताप बहादूर सिंग (प्रेम चोप्रा) याला उद्देशून. आश्चर्य वाटतेय? उंचावरील एका अतिशय प्रसन्न अशा गार्डनमध्ये हा अनोख्या ’प्रेमाचा खेळ’ रंगलाय आणि राजकुमार सिंग ’राजा’ (धर्मेंद्र) व त्याचा साथीदार इमारतीलाल (जॉनी वॉकर) हे आडोश्याला उभे राहून हा सगळा प्रकार पाहताहेत. यावरुन राजकुमार सिंगचा जळफळाट होतोय….(खरं तर गरम धरमने पुढे सरसावत प्रेम चोप्राला बेदम कुटायला हवे.
पण तसे होत नाही.)
सिच्युएशन कशी वाटतेय? थीमनुसार ती आहे तर खरंच. पण त्यावरुन फिल्मी कट्ट्यावर छान गप्पा रंगत. प्रेम चोप्राला आपल्या भल्या मोठ्या कारकिर्दीत असा सुखद योग एकादाच. अर्थात ’कहानी की मांग के अनुसार’ असे यावर फिल्मी उत्तर असतेच. आणि हा फंडा मदन मोहला निर्मित सेव्हन आर्टस पिक्चर्स या बॅनरखालील मोहन सैगल दिग्दर्शित ’राजा जानी ’ (प्रदर्शन 3 नोव्हेंबर 1972) या म्युझिकल हिट चित्रपटातील.
सुपर हिट चित्रपट काळाला कधी मागे सारतो हे लक्षात येत नाही हेच खरे. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपट म्हणजे एक प्रकारची घुसळणच होती. त्यात अनेक चटक मटक आपापली स्पेस तयार करीत होता. त्यात एक फंडा गॉसिप्सचा होता. धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची पडद्यावर छान जमत असलेली जोडी पडद्यामागेही जमलीय/गुंफत चाललीय या टप्प्यावरचा हा चित्रपट. शराफत (1970), तुम हंसी मै जवॉ ( 1970), नया जमाना (1971) यानंतरचा या सुपर हिट जोडीचा ’राजा जानी’ हा चित्रपट आणि लगेचच ’सीता और गीता ’ (1972) ही आलाच. या जोडीने 28 चित्रपटात एकत्र भूमिका साकारली. एक फिल्मी रेकॉर्ड. त्यात ’राजा जानी’ त्यांच्या अनेक सुपर हिट पिक्चरमधील एक. यू ट्युबवर एन्जॉय करू शकता.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, अनेक सोबर भूमिका साकारत साठच्या दशकात आपली कारकीर्द आकाराला आणलेल्या धर्मेंद्रला ओ. पी. रल्हन दिग्दर्शित ’फूल और पत्थर’ ( 1965) मधील पोस्टरवरील उघड्या
निधड्या पिळदार पोझने
(या पिक्चरमधील आजारी मीनाकुमारीसोबतची पोझ. अर्थात कहानी की मांग) अ‍ॅक्शन हीरोची इमेज द्यायची जणू पेरणी केली. आणि मग कधी सोबर तर कधी देमार भूमिका साकारत साकारत तो पुढे जात राहिला आणि त्यात ’राजा जानी’ महत्वाचा. एव्हाना तो कात टाकण्यात यशस्वी ठरलेला. हेमा मालिनीने ’सपनो का सौदागर ’ (1968) पासून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले तेच ड्रीम गर्ल म्हणून आणि एकेक चित्रपट करत करत वाटचाल सुरु असताना एक भारी हिट हवाच होता. तो ’राजा जानी’ ठरला.
हा चित्रपट अपरीींरीळर या अमेरिकन चित्रपटावर आधारित असल्याचे म्हटले गेले. महत्वाचे असते ते त्याला हिंदी चित्रपटाचे रुपडं कसे दिले जातेय. अली रझा यांनी तसे कथा लेखन केले. नबेन्दु घोषने पटकथा लिहिली आणि हा मसालेदार मनोरंजक चित्रपट आकाराला आला.
याचे मध्यवर्ती कथासूत्र असे, राजघराण्याची वारसदार म्हणून राजकुमार सिंग उर्फ राजा (धर्मेंद्र) एका युवतीला त्यानुसार घडवण्याचे आव्हान स्वीकारतो (त्यामागचे खरे कारण चित्रपटाच्या क्लायमॅक्सला सापडते) आणि तो रस्त्यावर नाच काम करणार्‍या शम्मोची ( हेमा मालिनी) निवड करतो. अशा नाचकाम करणार्‍या युवतीमध्ये आंतर्बाह्य बदल करणे खूपच आव्हानात्मक असते. ते होत जाताना ती मॉडर्न बनते आणि पटकथा अनेक वळणे घेत घेत रंगत जाते. आता शम्मो रत्ना बनते. आता राजा आणि रत्ना यांची प्रेमकथा. दीवाण गजेंद्रसिंग (प्रेमनाथ) या सगळ्यात कुटील खेळी/डावपेच खेळवतात आणि पिक्चर रंगत जातो.
पिक्चरमध्ये अन्य भूमिकेत जॉनी वॉकर, सज्जन, हेलन, बिंदू, सी. एस. दुबे, सुरेश, मनमोहन इत्यादी. त्या काळात गीत, संगीत व नृत्य मनोरंजनात भर टाकत असे. आनंद बक्षी यांची गीते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताने झक्कास स्कोर केला. पिक्चरच्या सुरुवातीलाच जानी ओ जानी ( पार्श्वगायक किशोरकुमार) आणि मग थोड्याच वेळात दुनिया का मेला मेले मे लडकी ( लता मंगेशकर) गाण्यावर हेमा मालिनीचे बेहतरीन नृत्य. पटकथेत गाण्याच्या जागा नेमक्या पेरलेल्या/काढलेल्या आणि पिक्चर पुढे सरकता ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या. मुबारक हो तुझे ये दिल ( लता मंगेशकर), ए बी सी डी छोडो
(लता मंगेशकर), कितना मजा आ रहा है ( लता मंगेशकर), आजा आजा आजा ( लता मंगेशकर) . ही गाणी आजही लोकप्रिय. ए बी सी डी छोडो हे टिपिकल त्या काळातील हिंदी चित्रपटाच्या कल्चरमध्ये फिट्ट बसणारे. त्या काळात नायिका नायकाला पत्र लिहून देई
(रामपूर का लक्ष्मणमधील गुम है किसी के प्यार मे). अशा ग्रामीण भागातून आलेल्या नायकाला शुध्द कसे बोलायचे हे शिकवे. ए बी सी डी छोडो गाण्यात नायिकेला आधुनिक करण्यासाठी नायक तिला इंग्लिश शिकवतोय तर ती म्हणते, नैना से नैना जोडो…. धमाल सिच्युएशन आणि पिक्चरमध्ये रंगत.
दिग्दर्शक मोहन सैगल यांची वाटचाल विविध प्रकारचे चित्रपट रसिकांसमोर आणण्याची. त्यामुळे मेकिंगमध्ये तोचतोचपणा येत नाही. न्यू दिल्ली ( 1956), अपना हाथ जगन्नाथ ( 1960), करोडपती ( 1961), देवर (1966), कन्यादान ( 1968), साजन ( 1969), सावन भादों (1970) यानंतरचा त्यांचा ’राजा जानी’. हा चित्रपट.
’राजा जानी’ हा त्या काळाला अतिशय फिट्ट बसेल अशा फॉर्मुल्यावरील मनोरंजक चित्रपट. राजघराणे, संपत्तीचा वारसदार, संपत्तीवर एकाद्याची बुरी नजर, कुटील डावपेच आणि मोठा संघर्ष. क्लायमॅक्सला धक्कादायक रहस्याची उकल. या सार्‍याची भक्कम मांडणी महत्वाची. तीच ’राजा जानी’मध्ये जमून आली. अहो, यश दूरवर राहिलचं कसे?आणि यशच कायम लक्षवेधक असते.
धर्मेंद्रच्या तब्बल पासष्ट वर्षांच्या खणखणीत अष्टपैलू वाटचालीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट सांगायचे तर राजश्री प्रॉडक्शन निर्मित व सत्येन बोस दिग्दर्शित जीवन मृत्यू (1970) हा चित्रपट महत्वाचा. मुंबईतील अलंकार चित्रपटगृहात हा चित्रपट मॅटीनी शोला प्रदर्शित झाला आणि पहिल्याच खेळापासून सुपरहिट ठरला.
या चित्रपटाने अलंकार चित्रपटगृहात तब्बल 104 आठवड्याचा खणखणीत मुक्काम केला. राखी गुलजारची भूमिका असलेला हा पहिला चित्रपट आणि आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, मॅटीनी शोला जुने चित्रपट प्रदर्शित व्हायची परंपरा असताना थेट मॅटीनी शोला प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट.
धर्मेंद्रच्या अष्टपैलू कारकिर्दीतील हा एक वेगळाच विक्रम. आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले ची कायमच चर्चा होत असतेच. शोले ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने याच वर्षी जुहू येथील बंगल्यात धर्मेंद्रची आवर्जून भेट घेऊन त्यांना माझ्या कलेक्शनमधील शोले ची वृत्तपत्रीय जाहिरात, शोलेचे काही फोटो आणि हीच काय चुकले या मराठी चित्रपटात भूमिका साकारलेले फोटो दाखवले असता त्यांनी इतकेच म्हटलं, तस्वीरें बोलती हैं….
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात धर्मेंद्रचे अनेक वैशिष्ट्यांसह असलेले स्थान कायमच आठवणीत राहिल…
– दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply