मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचघर, फणसाड, विहूर आणि आंबोली या धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे यंदा मुरूड तालुका टँकरमुक्त होण्याचे आशादायी चित्र दिसत आहे.
गारंबी व सवतकडा या योजनांसह आंबोली धरणातून मुरुडसह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. गारंबी व सवतकडा पाणी योजनेतून गुरुत्व पध्दतीने पिण्याचे पाणी पुरवले जाते तर आंबोली धरणातून विजेच्या पंपाद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा या जलाशय क्षेत्रात कमी पाऊस झाला असला तरी सध्या चिंचघर, फणसाड, विहूर आणि आंबोली या धरणांत पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत या धरणातून पुरसा पाणी पुरवठा होऊ शकेल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
पुर्वानुभव लक्षात घेऊन यंदाही मुरूड तालुक्याचा पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात नविन विंधण विहिरी घेणे, तात्पुरती नळ योजना, विहीर दुरुस्ती, विहिरी खोल करणे आदी योजनांसाठी अंदाजित खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मार्च 2021 अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याबाबतचा एकही प्रस्ताव आलेला नाही, अशी माहिती मुरूडचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी दिली.