पनवेल : वार्ताहर
उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय साकारण्यासाठी जीवनात उपयुक्त ठरणार्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (वायसीएमओयू) उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची मागणी असल्याने कृषी व बीएड शिक्षणक्रम वगळून इतर शिक्षणक्रमांच्या प्रवेशांची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यापीठात अनेक पदविका शिक्षणक्रमांचे ऑनलाइन प्रवेश सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश नोंदवावेत, असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख व मुंबई विभागाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. वामन नाखले यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष 2021 -22 च्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन बैठक रायगड जिल्ह्यातील यशवंत मेमोरियल ट्रस्ट, पनवेल येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुक्त विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रवेश एक जुलैपासून सुरू आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना डॉ. ई. वायुनंदन यांनी प्रवेशशुल्क माफ केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. नाखले यांनी केले.या वेळी विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्राचे सहायक कुलसचिव श्री. तुळशीराम सोनावणे, प्रशासकीय संयोजिका जान्हवी करमासे आणि वरिष्ठ सहाय्यक रागिणी पाटील आणि रायगड जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रांचे केंद्र प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंत मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश मुळे आणि प्राचार्य प्रा. मनोज मुळे यांचेही मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. पनवेलमधील अग्रगण्य असलेल्या बापूसाहेब डी.डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांचा या वेळी विभागीय केंद्रातर्फे सत्कारही करण्यात आला होता.